भारतीय कापूस महामंडळाकडून कापूस खरेदी बंद

भारतीय कापूस महामंडळाकडून कापूस खरेदी बंद
भारतीय कापूस महामंडळाकडून कापूस खरेदी बंद

जळगाव ः बाजारात तेजी असतानादेखील भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) फक्त दुय्यम दर्जाचा (दुसरी ग्रेड) कापूस खरेदी करण्याचा आडमुठेपणा कायम ठेवल्याने सीसीआयच्या केंद्रातील आवक जवळपास थांबली आहे. सीसीआयचे राज्यभरातील खरेदी केंद्र बंदावस्थेत आहेत. याच वेळी पणन महासंघाच्या काही केंद्रांमध्ये कापसाची आवकच झाली नाही. तर काही केंद्रांत नगण्य आवक झाली आहे. 

जिनिंग प्रेसिंग कारखान्यात सध्या ५७०० ते ५७५० रुपये प्रतिक्विंटल या दरात २९ ते ३० मिलिमीटर लांब धागा, ३.५ ते ४.३ मायक्रोनिअर (ताकद) आणि ९ टक्‍क्‍यांपर्यंत आर्द्रता व अडीच टक्के ट्रॅश (कचरा वगैरे) अशा दर्जाच्या कापसाची खरेदी केली जात आहे. तर खेडा खरेदीमध्ये कापसाला प्रतिक्विंटल ५६०० रुपयांवर दर मिळत आहेत, असे असताना सीसीआयने २७.५ ते २८.५ मिलिमीटर लांब धागा, ३.५ ते ४.७ मायक्रोनिअर, दोन टक्‍क्‍यांपर्यंत ट्रॅश व ३५ चा उतारा (एका क्विंटल कापसात किमान ३५ किलो रुई अपेक्षित) अशा दर्जाचा कापूस ५३५० रुपये प्रतिक्विंटल या दरात खरेदी करण्यासंबंधीचा आडमुठेपणा कायम ठेवला आहे. 

शेतकऱ्यांचा कमाल कापूस हमीभावापेक्षा कमी दरात गेला सध्या कापूस दर तेजीत असले तरी फक्त पाच टक्के शेतकऱ्यांना या अधिक दरांचा लाभ मिळत आहे. कारण कमाल शेतकऱ्यांनी जानेवारी व फेब्रुवारीमध्ये खेडा खरेदीत ५२०० ते ५३०० रुपये दरात म्हणजेच हमीभावापेक्षा कमी दरात राज्यात कापूस व्यापारी, खरेदीदारांना दिला. या बिकट स्थितीत सीसीआयने आपला आडमुठेपणा कायम ठेवला. दर्जा, उतारा, असे निकष समोर करून खानदेश, मराठवाड्यात अनेक ठिकाणी खरेदी टाळली. खानदेशात अंदाजित पाच लाख गाठींच्या कापसाची खरेदी हमीभावापेक्षा कमी दरात व्यापाऱ्यांनी खेडा खरेदीत केल्याचा दावा सूत्रांनी केला.

सीसीआयचा सबएजंट म्हणून पणन महासंघ कापसाची खरेदी करतो. पण महासंघावर सीसीआयचे निकष लादले जातात. जेव्हा दर कमी होते, तेव्हा शेतकऱ्यांची पिळवणूक खरेदीदारांना गावोगावी केली. सीसीआयने अगदी अल्प खरेदी त्या वेळेस केली. आमच्या केंद्रांमध्ये कापसाची विदर्भात नगण्य खरेदी झाली. खानदेशात नऊ केंद्र प्रस्तावित केले होते. पण फक्त तीनच केंद्र सुरू झाले. त्यातही एक बोंड कापसाची आवक झाली नाही. केंद्र सरकारने कापूस खरेदीसंबंधी महासंघाला थेट अधिकार बहाल केले पाहीजेत.  - संजय पवार, संचालक, महाराष्ट्र राज्य पणन महासंघ

सीसीआयची खानदेशात नऊ केंद्रे प्रस्तावित होती. पण जळगाव, शिरपूर (जि. धुळे) येथे खरेदी जानेवारीत काही प्रमाणात झाली. एरंडोलात नगण्य कापूस आवक झाली. खरेदी कमी झाली, याचे कारण म्हणजे दर्जाबाबतचे काही जाचक निकष. हे निकष फूटपट्टी लावून तपासले जात होते. यामुळे जेव्हा दरांवर दबाव होता, तेव्हा खेडा खरेदीत व्यापाऱ्यांनी कापसाची मोठी खरेदी गावोगावी जाऊन राज्यभर केली. एकट्या खानदेशात २२ ते २५ लाख गाठींचे उत्पादन अपेक्षित आहे. यातील १० टक्के कापसाची खरेदीदेखील सीसीआय करू शकले नाही. आजघडीला राज्यातील सीसीआयचे सर्वच केंद्र बंदावस्थेत आहेत. कारण कापसाचे दर वाढल्याने आवकच होत नाही.  - अविनाश भालेराव, सीसीआय केंद्रधारक जिनींग प्रेसिंग कारखानदार, जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com