ढगाळ वातावरणाचा शेतकऱ्यांना धसका

ढगाळ वातावरणाचा शेतकऱ्यांना धसका
ढगाळ वातावरणाचा शेतकऱ्यांना धसका

जळगाव : खानदेशात मंगळवारी (ता. १२) निर्माण झालेले ढगाळ वातावरण बुधवारी (ता. १३) अधिक वाढले. यामुळे शेतकरी, ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी ज्वारी मळणीवर आली आहे. गहू, कांदा व केळीचे पीकही जोमात आहे. या पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. 

थंडी सोमवारपर्यंत (ता. ११) जोमात होती. रात्रीचे तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत होते. मंगळवारी रात्री मात्र ढगाळ वातावरण तयार होताच, थंडी गायब झाली. हलके धुकेही वातावरणात पसरले. गहू निसवला असून, त्यात दाणे पक्व होत आहेत. शेतकरी सिंचनाच्या लगबगीत आहेत. तापी, गिरणाकाठी ज्वारीचे पीक जोमात असून, कणसे भरली आहेत. अनेक ठिकाणी कणसे पक्व झाली आहेत.  पुढील आठवड्यात कापणी व मळणीची कामे सुरू होतील. बागायती क्षेत्रात हरभरा पीक जोमात आहे. शिरपूर व शहादा भागात काही शेतकऱ्यांच्या शेतात हरभरा पिकाची कापणी आटोपली असून, शेतात तो वाळविण्यासाठी सऱ्यांमध्ये तसाच पडून आहे. काही ठिकाणी घाटे पक्व झाले आहेत. 

धुळे जिल्ह्यातील साक्री, पिंपळनेर, नेर, कुसुंबा, कापडणे, न्याहळोद, जळगाव जिल्ह्यातील किनगाव, डांभुर्णी, पिलखोड, अडावद, गोरगावले भागात कांदा पीक जोमात आहे. अनेक ठिकाणी कांदा पीक एक महिन्याचे झाले आहे. बीजोत्पादनासंबंधीचे कांदा पीकही जोमात अंकुरले आहे. अशा सगळ्या स्थितीत ढगाळ वातावरण तयार झाल्याने शेतकऱ्यांना बेमोसमी पाऊस, गारपिटीची भीती आहे. नुकसानीची चिंता सतावू लागली आहे. 

खानदेशातील शहादा, रावेर, चोपडा, मुक्ताईनगर, यावल, पाचोरा भागात तापी, गोमाई व गिरणा नदीकाठी केळी पिकही आहे. मध्यंतरी तिला थंडीचा फटका बसला. नवीन लागवडीच्या बागांमध्ये (कांदेबाग) तण नियंत्रण, खते देण्याचे काम सुरू आहे. दोन ते अडीच महिन्यांच्या बागा आहेत. रावेर, यावल, शहादा व पाचोरा भागांत केळी काढणीवर आहे. ढगाळ वातावरण लक्षात घेता काही शेतकऱ्यांनी पक्व होण्यास चार-पाच दिवस अवधी राहिलेला असतानाच काढणी उरकून घेतली. कारण पाऊस किंवा गारपीट झाली, तर तोंडचा घास हिरावला जाईल, अशी भीती या शेतकऱ्यांना आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com