खानदेशात पुन्हा ढगाळ हवामान 

Cloudy weather again in Khandesh
Cloudy weather again in Khandesh

जळगाव ः खानदेशात पुन्हा एकदा ढगाळ वातावरण तयार झाले आहे. सध्या हरभरा मळणी सुरू आहे. ज्वारीची कापणी सुरू असून, गहूदेखील अनेक भागात मळणीवर आला आहे. कोरोना विषाणूमुळे केळी, कापूस आदी पिकांचे दर दबावात असतानाच वातावरण प्रतिकूल असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला तर मोठे नुकसान सहन करावे लागेल, अशी चिंता शेतकऱ्यांना आहे. 

खानदेशात यंदाच्या हिवाळ्यात काही दिवसच थंडी होती. अनेक दिवस ढगाळ वातावरण राहिले. प्रत्येक महिन्यात किमान १८ ते २० दिवस ढगाळ वातावरण राहिले. अर्थातच यंदा हिवाळ्यात थंडी दोन-चार दिवसांचा अपवाद वगळता पडलेली नाही. मध्यंतरी दोन - तीन दिवस कोरडे वातावरण होते. आता मागील दोन-तीन दिवसांपासून पुन्हा ढगाळ वातावरण तयार होत असून, उशिराच्या रब्बी हंगामालाही फटका बसत आहे. 

विषम वातावरणामुळे गहू पक्व होण्याची गती मंदावली आहे. किमान तापमानात मागील दोन दिवस सतत चढउतार झाला आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात मागील आठवड्यात किमान तापमानाची नोंद २१ अंश सेल्सिअसपर्यंत झाली होती. तर जळगाव येथील कृषी संशोधन केंद्रातही दोन दिवस किमान तापमानाची नोंद २१ अंश सेल्सिअसपर्यंत झाली आहे. कमाल तापमान मागील दोन दिवस ३९ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदविले गेले आहे. पहाटे काहिसा गारवा असतो. परंतु, ढगाळ वातावरणामुळे आर्द्रतादेखील वाढली आहे. 

मागील हिवाळ्यात मोसमात खानदेशात किमान तापमान दोन अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. यामुळे गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांचे चांगले उत्पादनही हाती आले होते. मात्र, थंडीचे प्रमाण या मोसमात कमी राहिले, असे जाणकारांचे मत आहे.

मकर संक्रांतीनंतर थंडी वाढली होती. नंतर पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले. यामुळे रब्बी पिके हवी तशी नाहीत. उशिराच्या मका पिकावर ढगाळ वातावरणामुळे लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी फवारण्या करून घेत आहेत. वारंवार ढगाळ वातावरण तयार होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com