ढगाळ हवामानाचा अंदाज

cloudy weather
cloudy weather

पुणे ः अरबी समुद्रात असलेल्या पवन चक्रीवादळाचा प्रभाव अजूनही कोकण, दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात आहे. मात्र, मुंबईजवळ असलेले चक्रावाताची स्थिती निवळत असल्याने ढगाळ वातावरणाची तीव्रता कमी होत आहे. या भागात आज (शुक्रवारी) आणि उद्या (शनिवारी) या भागात काही प्रमाणात ढगाळ हवामान राहणार आहे. रविवारपासून (ता. ८) पुन्हा थंडी वाढण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.  अरबी समुद्राच्या वायव्येस पवन चक्रीवादळाची तीव्रता अधिक आहे. पुढील दोन ते चार दिवस त्याची तीव्रता राहणार आहे. हे चक्रीवादळ येमेनमधील सोकोट्रापासून आग्नेयेच्या दिशेला सुमारे ४७० किलोमीटर, तर सोमालियातील बोसासोपासून ८२० किलोमीटर अंतरावर आहे. तर दुसऱ्या चक्रावाताची स्थिती ही मुंबईपासून नैर्ऋत्याकडे ७१० किलोमीटर तर गोव्याच्या पश्चिमेस ६८० किलोमीटर अंतरावर आहे. आज या चक्रावाताची स्थिती निवळण्याची शक्यता असून कोकण, मध्य महाराष्ट्रात हवामान काही प्रमाणात कोरडे राहील. त्यामुळे राज्यातून गायब झालेली थंडी पुन्हा परतण्याची शक्यता आहे.   ढगाळ हवामानामुळे मुंबई, पालघर परिसरात पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे भात उत्पादकांची काही प्रमाणात धावपळ झाली. मात्र, यामुळे किमान तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. सरासरीच्या तुलनेत सहा अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली असून कोकणातील किमान तापमान २५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रातही हवामान अंशतः ढगाळ असून, किमान तापमान १५ ते २१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. महाबळेश्वर येथे १५.२ अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान नोंदविले गेले. विदर्भाच्या अनेक भागात हवामान कोरडे असल्याने किंचित थंडी होती. गुरुवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत गोंदिया येथे १२.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली. नागपूरमध्ये १३.७ अंश सेल्सिअस एवढे तापमान होते. तर चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा या भागांतही १६ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान होते. मराठवाड्यातही ढगाळ हवामानाचा प्रभाव कमी अधिक आहे. त्यामुळे थंडी कमी असून, किमान तापमान १४ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. उस्मानाबाद, परभणी या भागात किंचित थंडी असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com