लवंगी, बेडगी, लाल मिरचीला नगरच्या बाजारात तेजी 

नगर येथील बाजार समितीत गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून बुलडाणा लवंगी मिरचीने भाव खाल्ला आहे. मागील आठवड्यात प्रतिक्विंटल वीस हजारांपर्यंत दर गेला होता. आता शेवटच्या खुडव्याची मिरची येत असली तरीही सध्या लवंगीला चौदा ते पंधरा हजारांपर्यंतचा दर मिळत आहे.
Clove, Bedgi, Red Chilli boom in the town market
Clove, Bedgi, Red Chilli boom in the town market

नगर ः नगर येथील बाजार समितीत गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून बुलडाणा लवंगी मिरचीने भाव खाल्ला आहे. मागील आठवड्यात प्रतिक्विंटल वीस हजारांपर्यंत दर गेला होता. आता शेवटच्या खुडव्याची मिरची येत असली तरीही सध्या लवंगीला चौदा ते पंधरा हजारांपर्यंतचा दर मिळत आहे. याशिवाय आध्रांचा ‘तेजा’, गंटूर, कर्नाटकच्या ‘बेडगी’लाही चांगली मागणी आहे. नगरसह सोलापूर, उस्मानाबाद भागांतून येत असलेल्या स्थानिक लाल मिरचीलाही चौदा हजारांपर्यंतचा दर मिळत आहे. 

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत फेब्रुवारी-मार्च महिन्यात लाल मिरचीची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. नगरला दहापेक्षा अधिक मिरचीचे खरेदीदार आहेत. खास करून औरंगाबाद, बीड, जालन्यासह विदर्भ, खानदेशातून बुलडाणा ‘लवंगी मिरची’ आवक अधिक असते. मागील महिन्यात लवंगीची दर दिवसाला ८० ते १०० क्विटंल आवक होत होती. दरही एकवीस हजार रुपये क्विटंलपर्यंत गेला होता. सरासरी दर सतरा हजारांपर्यंत मिळत होता. मिरचीला मिळणारा आतापर्यंतचा हा सर्वाधिक दर होता. आता लवंगीचा शेवटचा तोडा झालेली मिरचीची आवक होत असली, तरी दहा ते पंधरा हजारांपर्यंतचा दर मिळत आहे. याशिवाय आंध्र प्रदेशातून आवक होत असलेल्या तेजा, गुंटूर मिरचीची प्रत्येकी दहा क्विंटलची आवक होत आहे. 

मसाल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कर्नाटकाच्या ‘बेडगी’ मिरचीलाही चांगली मागणी आहे. नगरला दररोज दहा ते पंधरा क्विंटल बेडगीची आवक होत असून, बेडगीला पंधरा हजारांपासून पंचवीस हजारांपर्यंत दर मिळत आहे. नगरसह सोलापूर, उस्मानाबाद भागांतून येणारी स्थानिक मिरचीची आठ ते दहा क्विंटलची आवक होत असून तेरा ते चौदा हजारांपर्यंत प्रतिक्विंटलला दर मिळत आहे. 

नगर बाजारात आतापर्यंत पहिल्यांदाच लाल मिरचीला सर्वाधिक दर मिळत आहे. अजून साधारण पंधरा ते वीस दिवस लाल मिरचीची आवक सुरू राहील. नगरमधून लाल मिरची मुंबई, पुणे, नाशिकसह काही प्रमाणात परराज्यांतही जाते, असे बाजार समितीचे संतोष बेरड यांनी सांगितले.

नगरला लवंगी, तेजा, गुंटूर, बेडगीची आवक होत असते. यंदा मिरचीच्या दरात तेजी राहिली. यंदा मिरचीची उत्पादनही चांगले निघाले आहे. मराठवाडा, विदर्भ, बुलडाणा भागांतून येणारी लवंगी तिखट मिरचीला अधिक मागणी असते.  - गोपाल मनियार, मिरची खरेदीदार, नगर 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com