भाजप उमेदवारांच्या यादीवर मुख्यमंत्र्यांचा वरचष्मा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई ः लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या उमेदवारांच्या यादीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वरचष्मा स्पष्टपणे दिसतो. लोकसभा निवडणुकीत आपल्या मर्जीतील उमेदवार देऊन फडणवीस यांनी दिल्लीच्या राजकारणात स्वत:ची फळी उभारण्यास सुरवात केल्याचे बोलले जाते. राजकारणातील 'लंबे रेस का घोडा' म्हणून स्वत:ला सिद्ध करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून भविष्यातील राजकीय डाव टाकण्यास सुरवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी राज्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर टाकली आहे. भाजप नेतृत्वाने युतीच्या जास्तीत जास्त जागा जिंकून देण्याचे टार्गेट फडणवीस यांना दिले आहे. त्यासाठी उमेदवार निवडीपासून निवडणूक यंत्रणा राबविण्यापर्यंतचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार फडणवीस यांनी आपल्या यंत्रणेकडून सर्वेक्षण करून उमेदवार निवडले. 'इलेक्टीव मेरीट'वर उमेदवार निवडताना फडणवीस यांनी विद्यमान खासदारांना घरी बसविण्याचा निर्णय घेतला. भाजपने विद्यमान २२ खासदारांपैकी दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण, पुण्यातून अनिल शिरोळे, अहमदनगरमधून दिलीप गांधी, लातूरचे सुनील गायकवाड, सोलापूरातून शरद बनसोडे यांना नारळ दिला. उमेदवारी नाकारलेल्या खासदारांमध्ये किरीट सोमैया यांच्या नावाचीही भर पडली. ज्यांना तिकीट नाकारले त्यांच्या जागी फडणवीस यांनी प्रसंगी अन्य पक्षातील वजनदार नेत्यांना संधी दिली. त्यात भारती पवार (दिंडोरी), सुजय विखे-पाटील (अहमदनगर) यांचा समावेश आहे. माढाची जागा राष्ट्रवादीकडून हिसकावून घेण्यासाठी फडणवीस यांनी थेट रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना मैदानात उतरवले. विजयसिंह मोहिते-पाटील यांची मदत घेऊन मुख्यमंत्र्यांनी येथे जोर लावला आहे. याशिवाय विद्यमान जागांवर सुधाकर शृंगारे (लातूर) जय सिद्धेश्वर स्वामी (सोलापूर) आणि मनोज कोटक (ईशान्य मुंबई) यांना संधी दिली. भंडारा-गोंदियाच्या पोटनिवडणुकीतील पराभव लक्षात घेऊन येथे फडणवीस यांनी सुनील मेंढे या नव्या दमाच्या चेहऱ्याला मतदारांसमोर आणले आहे. मुख्यमंत्र्यांची नजर दिल्लीच्या राजकारणावर तरुण वयात महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळालेल्या देवेंद्र फडणवीस यांची नजर आता दिल्लीच्या राजकारणावर आहे. गेल्या साडेचार वर्षांत फडणवीस यांनी पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या गुडबूकमध्ये स्थान पटकावले. त्यामुळे पक्षात फडणवीस यांचे वजन वाढले आहे. आणखी काही वर्षे राज्यात काम करून दिल्लीच्या राजकारणात उडी घेण्याची तयारी फडणवीस यांनी ठेवली आहे. भविष्यात केंद्र सरकारमध्ये मोठी जबाबदारी मिळाली तर महाराष्ट्रातील खासदारांचे पाठबळ आपल्या मागे उभे रहावे, या हेतूने फडणवीस यांनी लोकसभेसाठी उमेदवार निवडून राजकीय जुळवाजुळव केली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com