कर्जमाफीत सहकारी सेवा सोसायट्या अडचणीत

Co-operative service societies in trouble about farmer loan
Co-operative service societies in trouble about farmer loan

सिंधुदुर्ग ः यंदा खरीप हंगामासाठी घेतलेले कर्ज माफ होईल या भरवश्‍यावर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे सहकारी सेवा सोसायट्या अडचणीत आल्या आहेत. एरवी डिसेंबरअखेर कर्जाची परतफेड करणारे शेतकरी आता सोसायटीच्या कार्यालयाकडे फिरकताना दिसत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील २२६ सेवा सोसायट्याचे व्यवहार ठप्प झाले आहेत.

जिल्हा बँकेशी संलग्न असलेल्या सहकारी सेवा सोसायट्यांनी खरीप हंगामाकरिता ६५ कोटी ९० लाखांचे कर्ज हजारो शेतकऱ्यांना वितरित केले. खरिपासाठी राष्ट्रीय बँका, ग्रामीण बँका, जिल्हा बँका आणि सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून २४९ कोटी १० लाख रुपये कर्जाचे वितरण केले आहे. जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी आणि काजू, आंबा बागायतदार खते, कीटकनाशके यांसह विविध अवजारे खरेदीकरिता सेवा सोसायट्यांकडून जूनमध्ये कर्ज घेतात. 

कर्जाची रक्कम ही ५ हजार रुपयांपासून लाख रुपयांपर्यंत असते. हे घेतलेले कर्ज शेतकरी साधारणपणे भात कापणी झाल्यानंतर भरणा करतात. नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत अधिकतर कर्जाची परतफेड करतात. डिसेंबर अखेरपर्यंत ४० ते ४५ टक्के शेतकरी या दोन महिन्यांत कर्जाची परतफेड करतात. परंतु, यंदा डिसेंबर महिना संपत आला तरी शेतकरी सेवा सोसायट्यांकडे कर्जाची परतफेड करण्यासाठी फिरकताना दिसत नाही. 

कर्जाची वसुलीकरिता आग्रह करणाऱ्या सोसायटीच्या सचिवांना कर्जमाफी होणार असल्याचे शेतकरी स्पष्टपणे सांगत आहेत. कर्मचाऱ्यांच्या या भूमिकेमुळे सोसायटीचे कर्मचारी हतबल आहेत. सोसायटीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३१ सप्टेंबर २०१९ पर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे यावर्षी जूनमध्ये खरिपांसाठी घेतलेले कर्ज माफ होण्याची शक्यता कमी आहे. शेतकऱ्यांनी कर्ज न भरण्याची भूमिका कायम ठेवली तर मात्र सेवा सोसायट्यांचे व्यवहार पूर्णपणे ठप्प होण्याची भीती आहे. जिल्ह्यातील सर्व संस्था अडचणीत येण्याची शक्यता आहे.

खावटी कर्जमाफी अजूनही नाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे १३ कोटीची खावटी कर्जमाफी देण्याचे फडणवीस सरकारने जिल्हा बँकेच्या प्रतिनिधींना आश्‍वासन दिले होते. त्यामुळे खावटी कर्जदारांनी देखील आपले थकीत कर्ज भरणा केलेले नाही. खावटी कर्जमाफीचा अद्यादेश काढण्यात आला. मात्र, त्याची अमंलबजावणी आजमितीस झालेली नाही.अजूनही खावटी कर्जदारांचे कर्जमाफ झालेले नाही.

शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा कोकणातील प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही. जिल्ह्यातील शेतकरी आपल्या गरजा बाजूला ठेवून कर्जाची परतफेड करीत असतो. याचा अर्थ त्याच्याकडे पैसा आहे असा होत नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा विचार होणे आवश्‍यक आहे. - सुशांत नाईक, शेतकरी, वेतोरे, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग

या वर्षीचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला आहे. शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळायला हवी होती. - महेश रावराणे, अध्यक्ष, आत्मा समिती वैभववाडी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com