सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा ३१ मार्चपर्यंत स्थगिती

राज्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागून राहिलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पाचव्यांदा ३१ मार्चपर्यंत स्थगिती देण्याचे आदेश राज्य शासनाने काढले.
Co-operative society elections postponed again till March 31
Co-operative society elections postponed again till March 31

कोल्हापूर ः राज्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागून राहिलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पाचव्यांदा ३१ मार्चपर्यंत स्थगिती देण्याचे आदेश राज्य शासनाने काढले. या निर्णयाने कोल्हापूर जिल्ह्यातील गोकूळसह जिल्हा बॅंक, राजाराम कारखान्यासह सुमारे एक हजार संस्थांची प्रक्रिया थांबणार आहे. ज्या टप्प्यावर प्रक्रिया सुरू आहेत, त्या टप्प्यावरच स्थगिती देण्यात आल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा खेळखंडोबा सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे आदेशात म्हटले आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यासह जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच सभा, समारंभ, आंदोलने, यात्रांना पुढील आदेशापर्यंत बंदी घातली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी (ता. २४) झालेल्या बैठकीत सहकारी संस्थांच्याही निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. त्यानुसार सहकार विभागाने या निवडणुकांना स्थगिती देत असल्याचा आदेश सायंकाळी काढला.

या नव्या आदेशामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा खेळखंडोबा सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांत तीन वेळा स्थगिती उठवली व पुन्हा प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिले. ‘गोकुळ’ची प्रारूप यादी प्रसिद्ध होऊन त्यावर हरकत दाखल करण्याचा बुधवारी अखेरचा दिवस होता, तर जिल्हा बॅंकेची ठराव संकलनाची प्रक्रिया मंगळवारीच संपली. उच्च व सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याबाबत आदेश दिलेल्या सहकारी संस्था, २५० पेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना या मुदतवाढीतून वगळले आहे. मात्र निवडणुकीबाबतचे नियम अंतिम होईपर्यंत या सोसायट्यांना निवडणूक घेता येणार नसल्याचे आदेशात नमूद आहे.

पाचव्यांदा मुदतवाढ राज्य सरकारने कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर याआधी मार्चच्या अखेरीस या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पहिल्यांदा ३० जूनपर्यंत, दुसऱ्यांदा ३० सप्टेंबरपर्यंत, तिसऱ्यांदा ३१ डिसेंबरपर्यंत तर १६ जानेवारी रोजी चौथ्यांदा ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतु चौथी मुदतवाढ त्यानंतर चारच दिवसांनी म्हणजे २० जानेवारी २०२१ ला मागे घेत, निवडणुका घेण्याचा नवा आदेश काढला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com