पौष्टिक धान्यांच्या आहारातील वापराला शासन देणार प्रोत्साहन

पौष्टीक अन्न
पौष्टीक अन्न

नागपूर ः ज्वारी, बाजरीसारख्या पौष्टिक खाद्यान्नाचा आहारातील वापर वाढावा, याकरिता या दोन्हीपासून विविध उपपदार्थ तयार करण्याची सूचना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्यातील चारही विद्यापीठांना केली होती. अकोल्यातील महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सहकार्याने अकोला कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाने ज्वारी, बाजरीपासून बिस्कीट तयार केले. या बिस्किटाच्या चवीने राज्यपालांनाही भुरळ घातल्याने हे बिस्कीट राज्यपालांच्या परीक्षेत पास झाले आहेत.  विविध खाद्यान्नात मैद्याचा उपयोग होतो. ब्रेड, बिस्कीटदेखील मैद्यापासून तयार केली जातात. परंतु ते खाल्ल्याने शरीराला कोणत्याच पौष्टिक घटकांचा पुरवठा होत नाही. उलट आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात. ज्वारी, बाजरी, नाचणी, भादली यांसारख्या धान्यापासून तयार जिन्नस पौष्टिक असतात. मानवी आहारासोबतच जनावरांकरिता चाऱ्याची सोयदेखील या माध्यमातून करणे शक्‍य होते.

अशाप्रकारे दुहेरी उद्देश ज्वारी, बाजरीसारख्या धान्य लागवडीतून साध्य होतो. परंतु नजीकच्या काळात ज्वारी, बाजरी, नाचणी, भादली व तत्सम पौष्टिक असलेल्या पिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, या पिकांखालील लागवड क्षेत्रातही घट झाली आहे.  आरोग्य राखण्याकरिता मात्र हे क्षेत्र वाढणे गरजेचे आहे. त्याकरिता ज्वारी, बाजरीचा वापरही त्याच प्रमाणात वाढण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना ज्वारी, बाजरी व इतर पौष्टिक धान्यापासून तयार होणाऱ्या विविध उपपदार्थांची माहिती घेण्यास सांगितले होते. अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठालादेखील हे टास्क देण्यात आले. कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाने त्यासाठी महिलांच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी संपर्क साधला. आय.टी.आय. मधील बेकरी विभागाने ज्वारी, बाजरीपासून बिस्कीट तयार करून दिले. राज्यपालांना हे बिस्कीट कृषी विद्यापीठामार्फत पाठविण्यात आले. या बिस्किटांच्या चवीने राज्यपालांना भुरळ घातली असून, त्यांच्या पसंतीस ते उतरले आहेत.  शासकीय उपाहारगृहांसह इतर ठिकाणी हे पदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या माध्यमातून पोषक धान्य लागवडीला प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा आहे. शासकीय महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रमोद भंडारे, बेकरी विभागाच्या प्रा. रजनी भंडारे, अभियांत्रिकी विभागाचे डॉ. प्रदीप बोरकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com