नवी दिल्ली : नाशिकमध्ये २२ जणांचे प्राण घेणाऱ्या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेमुळे संपूर्ण दे
अॅग्रो विशेष
थंडीचा प्रभाव घटण्यास प्रारंभ
अरबी समुद्राच्या परिसरात चक्रीय स्थिती असल्याने हवेतील बाष्प ओढून घेतले आहे. यामुळे राज्यात हवामान कोरडे झाल्याने उन्हाचा चटका वाढू लागला आहे.
पुणे ः अरबी समुद्राच्या परिसरात चक्रीय स्थिती असल्याने हवेतील बाष्प ओढून घेतले आहे. यामुळे राज्यात हवामान कोरडे झाल्याने उन्हाचा चटका वाढू लागला आहे. त्यातच थंडीचा प्रभावही कमी होऊ लागला आहे. पुढील काही दिवस थंडी हळूहळू कमी होऊन किमान तापमानाचा पारा वाढेल. गुरुवारी (ता. २५) सकाळी आठ वाजेपर्यंत परभणी येथील कृषी विद्यापीठाच्या आवारात १३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत आहे. गेल्या आठवड्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर थंडीत चढउतार होत असून, थंडी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या वर आहे. गुरुवारीही हा पारा १३ अंश सेल्सिअसपर्यंत सरकला आहे. सकाळी अकरा वाजल्यानंतर उन्हाचा पारा काही प्रमाणात वाढू लागल्याने उकाड्यात वाढ होत आहे. त्यामुळे किमान तापमानाबरोबर कमाल तापमानातही वाढ होऊ लागली आहे. येत्या काही दिवस ही स्थिती अशीच राहणार असून, पुढील आठवड्यापासून थंडी बऱ्यापैकी कमी होण्याची शक्यता आहे.
राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यानंतर विदर्भातही थंडी कमी होऊ लागली आहे. सध्या राज्यातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन ते चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. कोकणात थंडी कमी झाल्याने किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.
मध्य महाराष्ट्रातही किंचित थंडी असल्याने किमान तापमान १३ ते २१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मराठवाड्यातील अनेक भागांत थंडी कमी झाली आहे. त्यामुळे किमान व कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. या भागात किमान तापमान १३ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. विदर्भातही काही ठिकाणी थंडी असल्याने किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे.
गुरुवारी (ता. २५) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः
- मुंबई (सांताक्रूझ) २१.४ (२)
- ठाणे २२
- अलिबाग २२.१ (३)
- रत्नागिरी २२.१ (२)
- डहाणू २१.२ (२)
- पुणे १६ (३)
- नगर १५.३
- जळगाव १४.३ (-१)
- कोल्हापूर २०.६ (३)
- महाबळेश्वर १६.९ (१)
- मालेगाव १८ (४)
- नाशिक १६ (२)
- निफाड १३.५
- सांगली १९.७ (३)
- सातारा १७.६ (२)
- सोलापूर २१ (२)
- औरंगाबाद १७.२ (१)
- बीड १६.५ (२)
- परभणी १४.९ (-३)
- परभणी कृषी विद्यापीठ १३
- नांदेड १६
- उस्मानाबाद १६.४
- अकोला १६.२
- अमरावती १७.३ (-१)
- बुलडाणा १८.७ (-१)
- चंद्रपूर १६.२ (-१)
- गोंदिया १४ (-२)
- नागपूर १५.२ (-१)
- वर्धा १५.८ (-१)
- यवतमाळ १८.५ (१)