कोरड्या हवामानामुळे गारठा वाढला 

cold
cold

पुणे ः अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव कमी झाल्याने राज्यात काही प्रमाणात हवामान कोरडे झाले आहे. यामुळे अनेक ठिकाणी धुके पडले असून पहाटेच्या गारठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली. आज (ता. २८) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहणार आहे. शुक्रवारी (ता. २७) सकाळी धुळे कृषी महाविद्यालयात १०.४ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे पावसाला पोषक वातावरण तयार झाले होते. त्यामुळे गेल्या दोन दिवस राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे हवेत गारवा तयार झाला असून पहाटेच्या गारठ्यात पुन्हा चांगलीच वाढ झाली आहे. सध्या राज्यात हवामान कोरडे झाले असले तरी तमिळनाडूच्या परिसरात काही प्रमाणात कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पुन्हा हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गारठा कमी अधिक होण्याची शक्यता आहे.  दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे सकाळी अनेक ठिकाणी धुक्याची चादर पसरत आहे. तर काही ठिकाणी पिकांवर दवबिंदू पडत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सकाळचे वातावरण सुखद वाटत असले तरी शुक्रवारी दुपारपर्यंत राज्यात ढगाळ हवामानाची स्थिती होती. दुपारनंतर काही प्रमाणात ऊन पडल्याने ढगाळ हवामानाची स्थिती निवळली होती. मात्र, संध्याकाळी काही प्रमाणात गारठा वाढण्यास सुरुवात झाली होती. वाढलेल्या गारठ्यामुळे राज्यातील बहुतांशी भागातील किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे.  कोकणातील बहुतांशी भागातील किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. या भागात किमान तापमान १८ ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रासह खान्देशातही गारठा चांगलाच वाढला असून किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. त्यामुळे किमान तापमान १० ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मराठवाड्यातही ढगाळ हवामानामुळे गारठा वाढला आहे. किमान तापमान १४ ते १८ अंश सेल्सिअसपर्यंत होते. विदर्भातील अनेक भागात गारठा वाढला आहे. यामुळे नागपूर, चंद्रपूर, बुलढाणा, गोंदिया, अमरावती, वर्धा, यवतमाळ या भागातील किमान तापमान १० ते १४ अशं सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते.  शुक्रवारी (ता. २७) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासातील विविध ठिकाणचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये, कंसात वाढ, घट ः  अकोला १४.८ (१), अलिबाग १९.४ (१), अमरावती १२.६ (-२), औरंगाबाद १४.० (३), बीड १८.० (५), बुलढाणा २८.५ (-२), चंद्रपूर १०.६ (३), डहाणू १६.८ (१), गोंदिया १०.५ (-२), जळगाव १२.० (१), कोल्हापूर २२.२ (७), महाबळेश्वर १४.९ (२), मालेगाव १४.२ (४), मुंबई १८.० (१), नागपूर १२.६, नांदेड १४.० (१), नाशिक १४.२ (४), निफाड १७.२, धुळे कृषी महाविद्यालय १०.४, उस्मानाबाद १५.० (२), परभणी १७.९ (५), लोहगाव १८.३ (६), पाषाण १७.२ (६), पुणे १६.८ (६), रत्नागिरी २३.४ (४), सांगली २२.१ (८), सातारा १९.४ (७), सोलापूर २२.४ (७), ठाणे २०.५, वर्धा १३.४ (१), यवतमाळ १४.० 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com