उत्तर महाराष्ट्राला थंडीचा विळखा 

उत्तर भारतातील गोठविणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्राला थंडीची विळखा पडला आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्र आणि धुळे येथील कृषी महाविद्यालयात यंदाच्या हंगामातील नीचांकी ४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
Cold snap in northern Maharashtra
Cold snap in northern Maharashtra

पुणे : उत्तर भारतातील गोठविणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्राला थंडीची विळखा पडला आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्र आणि धुळे येथील कृषी महाविद्यालयात यंदाच्या हंगामातील नीचांकी ४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अनेक ठिकाणी किमान तापमान १० अंशांच्या खाली घसरले आहे. आज (ता.२६) उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात थंडीच्या लाटेची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.   

आखाती देशातून आलेल्या धूळ वादळामुळे रविवारी (ता. २३) दिवसभर धुक्याचे साम्राज्य पसरल्यानंतर सोमवारपासून (ता.२४) राज्याच्या किमान तापमानात वेगाने घसरण होत आहे. तिशीपार गेलेले कमाल तापमान २७ अंशांपेक्षाही खाली आले. मंगळवारी (ता.२५) निफाड, नाशिक, धुळे, जळगाव, मालेगाव, पुणे, महाबळेश्वर, औरंगाबाद. उस्मानाबाद, बुलडाणा येथे किमान तापमान १० अंशांच्या खाली आले. 

वायव्य आणि मध्य भारतातील राज्यामध्ये थंडीची तीव्र लाट असून, उत्तर प्रदेशातील फतेहगड येथे देशाच्या सपाट भुभागावरील नीचांकी ३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पंजाब, हरियाना, चंडीगड, राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगड मध्य प्रदेश, गुजरातसह महाराष्ट्रातील उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात थंडीची लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

मंगळवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :  पुणे २५.४ (८.५), नगर - (७.९), धुळे २२.० (४.५), जळगाव २३.९ (८.६), कोल्हापूर २६.६ (१३.८), महाबळेश्वर - (८.८), मालेगाव २०.० (८.८), नाशिक २३.९ (६.३), निफाड २२.० (४.५ ), सांगली २७.० (१३.५), सातारा २५.८(१४.०), सोलापूर २६.० (११.२), सांताक्रूझ २४.८(१३.४), अलिबाग २४.० (१४.२), डहाणू २२.५ (१३.९), रत्नागिरी २६.० (१४.१), औरंगाबाद २३.४ (८.८), नांदेड २६.२ (१३.२), उस्मानाबाद - (९.६), परभणी २४.१ (१०.८), अकोला २४.९ (११.०), अमरावती २४.८ (१०.८), बुलडाणा २०.३ (९.२), ब्रह्मपुरी २५.३ (१२.४), चंद्रपूर २४.८ (१३.२), गडचिरोली २८.४(१३.०), गोंदिया २४.५ (१०.२), नागपूर २५.१ (१०.६), वर्धा २५.०(११.५), यवतमाळ २७.० (१०.५). 

निफाडमध्ये दवबिंदू गोठले  कडाक्याच्या थंडीने निफाड तालुक्यातील दिक्षी परिसरामध्ये दवबिंदू गोठल्याचे दिसून आले. तापमानात वेगाने घट झाल्याने दवबिंदूचे बर्फ तयार होते. निफाड येथे गेली काही वर्षे सातत्याने किमान तापमानाचा पारा खाली आल्याचे दिसून येत आहे. गहू संशोधन केंद्राकडील नोंदीनुसार १७ जानेवारी २०२० मध्ये आतापर्यंतच्या नीचांकी २.४ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. तर २०१८ आणि २०१९ मध्येही तापमान ४ अंशांपर्यत खाली आले होते. तर धुळे येथील कृषी महाविद्यालयातही २९ डिसेंबर २०१८ रोजी २.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. 

थंडीच्या लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :  मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक.  मराठवाडा : औरंगाबाद, जालना, परभणी.  विदर्भ : अकोला, अमरावती, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ.

दहा अंशांपेक्षा कमी किमान तापमान असलेली ठिकाणे    धुळे ४.५, निफाड ४.५, नाशिक ६.३, नगर ७.९, पुणे ८.५, जळगाव ८.६, महाबळेश्वर ८.८, मालेगाव ८.८, औरंगाबाद ८.८, उस्मानाबाद ९.६, बुलडाणा ९.२. 

दापोलीचा पारा ८.३ अंशावर  रत्नागिरी ः उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे कोकणवासियांना हुडहुडी भरली आहे. मिनी महाबळेश्‍वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोली तालुक्यात किमान तापमानाची नोंद ८.३ अंश सेल्सिअस झाली आहे. यंदाची ही सर्वांत कमी नोंद आहे. जिल्ह्यातही पारा घसरल्यामुळे सलग तीन दिवस वातावरण थंड होते.  दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस आणि चक्रीय वाऱ्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात सगळीकडेच धुळीच्या वादळाचा परिणाम दिसून येत होता. रविवारी (ता.२३) दुपारनंतर तापमानाचा पारा घसरु लागला. किनारपट्टीच्या भागामध्ये हलके वारेही वाहत होते. सोमवारीही दिवसभर वातावरण थंड होते. मंगळवारही दिवसभर थंडीची परिस्थिती कायम होती. या वातावरणाचा विपरीत परिणाम आंबा हंगामावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या बाबत आंबा बागायतदार प्रसन्न पेठे म्हणाले, ‘‘पहिल्या टप्प्यात आलेल्या कैरीची गळ मोठ्या प्रमाणात होत आहे. अतिरिक्त थंडीमुळे झाडांची सहनशक्ती कमी होते आणि त्याचा परिणाम फळांवर होतो. १८ अंशाखाली तापमान येऊ लागले की, ही परिस्थिती उद्भवते. सलग तीन दिवस तापमान प्रमाणापेक्षा कमी राहिले आहे. तसेच तिसऱ्या टप्प्यात आलेल्या मोहोराच्या सेटिंगवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, बोचरी थंडी पर्यटनाला पोषक असून, पर जिल्ह्यातील हौशी पर्यटकांनी किनारी भागाकडे मोर्चा वळवला आहे. परंतु कोरोनातील निर्बधांमुळे रत्नागिरीत गर्दी झालेली नाही.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com