रत्नागिरीत थंडी वाढली;  आंब्यासाठी पोषक हवामान 

मॉन्सूनोत्तर पावसाचा जोर ओसरू लागला असून, कोकणात गुलाबी थंडीचे वारे वाहू लागले आहेत. हे वातावरणा आंबा पिकाला अनुकूल असून, पर्यटकांसाठीही दिलासादायक ठरणार आहे.
Cold snap in Ratnagiri; Nutritious climate for mangoes
Cold snap in Ratnagiri; Nutritious climate for mangoes

रत्नागिरी ः मॉन्सूनोत्तर पावसाचा जोर ओसरू लागला असून, कोकणात गुलाबी थंडीचे वारे वाहू लागले आहेत. हे वातावरणा आंबा पिकाला अनुकूल असून, पर्यटकांसाठीही दिलासादायक ठरणार आहे. दापोलीत किमान पारा १४ अंशांपर्यंत खाली आल्यामुळे हवेतील गारवा वाढला आहे; मात्र या बदलांचा आंबा बागायतदारांसाठी किती फायदा होईल, हे पुढील आठवड्यात दिसून येणार आहे.  महिन्याभरात दोन टप्प्यांत पडलेल्या मुसळधार पावसाने मोहोर कुजून गेला असून, कैरीवर अ‍ॅथ्रॅक्सनोजचा प्रादुर्भाव झाला आहे. फळावर काळे डाग पडले असून, निसर्गापुढे बागायतदार हतबल झाले आहेत. शिल्लक राहिलेला मोहोर वाचवण्यासाठी औषध फवारणीचा मारा करावा लागत आहे. त्यामुळे खर्च वारेमाप होत असल्याची चिंता बागायतदारांनी व्यक्त केली.  मागील महिन्यात अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांच्या मेहनतीवर पाणी फिरवले होते. डिसेंबरच्या सुरुवातीलाही परिस्थिती जैसे-थे राहील, असेच वाटत होते; परंतु दोन दिवसांपूर्वीपासून हवेने मार्ग बदलला आहे. अवकाळीचे सावट सरू लागले आहे. कमाल व किमान तापमानात घट झाली असून, हवेत थंडी जाणवू लागली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे तापमानातील घट झाल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पहाटेच्या तापमानात घट झाली असून, दिवसाही पारा २० अंशांपर्यंत खाली आला आहे. मिनी महाबळेश्‍वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीमध्येही किमान पारा १४ अंशांवर आला आहे. येत्या काही दिवसांत थंडीचा जोर वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कमाल पारा ३० अंशांपर्यंत आला आहे. परंतु आगामी आठवड्यात कोकण किनारी जिल्ह्यात पावसाचीही शक्यता वर्तविली आहे. हा पाऊस मोजक्याच जागात पडणार आहे.  ऐन हंगामाच्या तोंडावर पावसाने घात केल्यामुळे पाच टक्क्यांहून अधिक मोहोराचे नुकसान झाले आहे. फवारण्या करणाऱ्या बागायतदारांनी मोहोर टिकवला असला तरीही बारीक कैरीवर काळे डागे पडले आहेत. पानांवरही काळे डाग दिसत आहेत. हे प्रमाण सध्या कमी असले तरीही पुन्हा पाऊस पडला तर झालेल्या नुकसानीत भर पडणार आहे. गेले दोन दिवस पडणाऱ्या थंडीमुळे बागायतदारांना दिलासा मिळाला आहे. काही झाडांना पालवी येत असून, थंडी कायम राहिली तर आठ दिवसांत मोहोर येण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे झाडांच्या मुळात ओलावा आहे. तो कमी झाल्याशिवाय पुढील अंदाज करता येणार नाही. सध्याचे वातावरण अनुकूल असल्याने पावसापासून वाचलेल्या मोहोरातून फळधारणा लवकर होईल. 

प्रतिक्रिया 

आंबा पिकाला सध्याचे वातावरण अनुकूल आहे; मात्र त्याचा फायदा पुढील आठ दिवसांमध्ये दिसून येईल. थंडी कायम राहिल्यास मोहोरातून लवकरच फळधारणा होईल.  - तुकाराम घवाळी, आंबा बागयातदार 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com