विदर्भात थंडीची लाट; नागपूर @ ५.७ अंश

विदर्भात थंडीची लाट; नागपूर @ ५.७ अंश
विदर्भात थंडीची लाट; नागपूर @ ५.७ अंश

पुणे : विदर्भात थंडीची लाट आली असून राज्यातील अनेक भागांत थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे अनेक ठिकाणी सकाळी धुके पडत आहे. पुढील काही दिवस थंडी कायम राहणार आहे. आज (ता. १२) विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट राहणार आहे.  शनिवारी (ता. ११) सकाळी विदर्भातील नागपूर येथे सर्वात कमी ५.७ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.   उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यातही थंडी वाढली आहे. विदर्भाच्या दिशेने अधिक प्रवाह असल्यामुळे शनिवारी विदर्भातील काही ठिकाणी थंडीची लाट आली होती. त्यामुळे किमान तापमानाचा पारा पाच अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला होता. आजही विदर्भात थंडीची लाट राहणार आहे. यामुळे विदर्भातील नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरणार आहे. काही भागात दिवसभर गारवा असला तरी उन्हाच्या झळा हव्याहव्याशा वाटत आहेत. सायंकाळी सहा वाजेनंतर पुन्हा थंडी वाढत जाऊन मध्यरात्रीनंतर चांगलीच थंडी वाढत आहे. पहाटे थंडीच्या तीव्रतेत वाढ होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात शनिवारी सकाळी अनेक भागात ढगाळ हवामानाची स्थिती होती. त्यातच सकाळी अनेक ठिकाणी धुके पडले होते. दुपारनंतर ही स्थिती निवळल्याने राज्यातील बहुतांशी भागात ऊन पडले होते.  उत्तर भारतातील दिल्ली, हरियाणा, चंडीगड, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान या भागात थंडीची लाट आली असून या भागात रात्रीसह थंड दिवस जाणवत आहे. त्यामुळे उत्तर भारतातील अनेक भागात कडाक्याची थंडी आहे. पूर्व मध्य प्रदेशातील बेतूल येथे सर्वात कमी १.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.   धुळे कृषी महाविद्यालयात ६.४ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. सोलापूर, कोल्हापूर, सांगली या भागातही किचित थंडी होती. राठवाड्यातही औरंगाबाद, परभणी, बीड या भागात थंडी कमी अधिक आहे. किमान तापमानाचा पारा किंचित कमी झाला असून किमान तापमान ११ ते १३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होता. विदर्भात थंडीच्या लाटेमुळे किमान तापमानाचा पारा पुन्हा घटला आहे. विदर्भात गोंदिया, ब्रह्मपुरी, गोंदिया, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपूर, अकोला या भागात चांगलीच थंडी वाढली आहे. यामुळे किमान तापमानाचा पारा ५ ते १० अंश सेल्सिअसच्या दरम्यान होता.   शनिवारी (ता. ११) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासातील विविध ठिकाणचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई २१.५, सांताक्रूझ २१.५, अलिबाग २०.२, रत्नागिरी २१.९, डहाणू २०.४, पुणे १३.७, अकोला ९.९, औरंगाबाद ११.५, जळगाव ११.२,  कोल्हापूर १७.५, महाबळेश्वर १३.४, नागपूर ५.७, नाशिक १२.५, निफाड १०.४, धुळे कृषी महाविद्यालय ६.४,  परभणी १३.५, परभणी कृषी विद्यापीठ १३.३, सांगली १८.०, सातारा १५.९,  सोलापूर १८.६,  अमरावती ९.५,  बुलढाणा ११.८, वाशीम १०.६, चंद्रपूर १०.४, ब्रह्मपुरी ६.३, गोंदिया ७.६, वर्धा ८.२, यवतमाळ १०.०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com