थंडी पुन्हा वाढणार 

cold
cold

पुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राज्यातील बहुतांशी भागांत असलेली ढगाळ वातावरणाची स्थिती निवळली आहे. यामुळे पुन्हा हवामान कोरडे झाले असून, गायब झालेली थंडी पुन्हा परतणार आहे. येत्या चार ते पाच दिवसांत राज्यातील अनेक भागांत थंडी वाढणार आहे. गुरुवारी (ता. ९) सकाळी नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ८.८ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला या शहरांच्या परिसरात बुधवारी (ता. ८) हलका पाऊस पडला. वातावरणात काही प्रमाणात गारवा तयार झाला आहे. त्यातच ढगाळ हवामानाची स्थिती निवळल्याने उत्तरेकडून काही प्रमाणात थंड वाऱ्यांचे प्रवाह वाहण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात पुन्हा थंडी वाढू लागली आहे. किमान तापमानाचा पारा आठ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे, त्यामुळे राज्यात काही भागांत दिवसभर गारवा असला तरी उन्हाच्या झळा हव्याहव्याशा वाटत आहेत. सायंकाळी सहानंतर थंडी वाढत जाऊन मध्यरात्रीनंतर चांगलीच थंडी वाढत आहे. सकाळी ही थंडी चांगलीच झोंबत आहे. 

कोरड्या हवामानामुळे थंडीचा पारा सरासरीच्या तुलनेत पाच ते सहा अंश सेल्सिअसने खाली आला आहे. कोकणातील मुंबई, सांताक्रूझ, अलिबाग, रत्नागिरी, डहाणू भागातही कोरड्या हवामानामुळे थंडी वाढली आहे. यामुळे किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंश सेल्सिअसने कमी होऊन तापमान १६ ते २१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रातही थंडीने चांगलेच हातपाय पसरले आहेत. त्यामुळे नाशिक, पुणे, मालेगाव, जळगाव, महाबळेश्वर, सातारा या भागात थंडीत वाढ झाली आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा कमी झाला असून अनेक भागांत ८ ते १५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते. 

सोलापूर, कोल्हापूर, सांगली या भागातही किचित थंडी होती. यामुळे या भागात १७ ते १९ अंश सेल्सिअस या दरम्यान तापमान होते. मराठवाड्यातही औरंगाबाद, परभणी, नांदेड या भागात किमान तापमानाचा पारा किंचित कमी झाला असून, किमान तापमान १३ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. विदर्भात वाढलेला किमान तापमानाचा पारा पुन्हा कमी झाला आहे. विदर्भात ब्रह्मपुरी येथे सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले. तर गोंदिया, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपूर, अकोला या भागात चांगलीच थंडी वाढली आहे. यामुळे किमान तापमानाचा पारा ११ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होता.  गुरुवारी (ता. ९) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील विविध ठिकाणचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः  मुंबई २१.०, सांताक्रूझ १६.४, अलिबाग १७.६, रत्नागिरी २१.०, डहाणू १७.१, पुणे १४.१, अकोला १५.२, औरंगाबाद १३.९, नांदेड १७.०, जळगाव १३.६, कोल्हापूर १७.५, महाबळेश्वर १३.०, नागपूर १५.९, नाशिक १०.२, मालेगाव १२.४, निफाड ८.८, परभणी १६.६, परभणी कृषी विद्यापीठ १५.३, सांगली १७.७, सातारा १४.९, सोलापूर १९.६, अमरावती १५.२, बुलडाणा १२.६, वाशीम १३.४, ब्रह्मपुरी ११.८, गोंदिया १५.६, वर्धा १७.७, यवतमाळ १७.०. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com