पीककर्जासाठी ‘ना देय’ची गरज नाहीः जिल्हाधिकारी निरुपमा डांगे

निरुपमा डांगे
निरुपमा डांगे

बुलडाणाः पीककर्जाची मागणी करण्यासाठी बँकांमध्ये जाणाऱ्या शेतकऱ्यांना इतर कागदपत्रांसह त्याच्या परिसरातील सर्वच बँकांने ना-देय (नोड्यूज) प्रमाणपत्र मागितले जात आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोचलेल्या तक्रारींची दखल घेत कुठली कागदपत्रे हवीत याची यादीच घोषित करण्यात आली आहे. यापुढे कुठल्याही बँकेचे पीककर्ज घेताना ना-देय प्रमाणपत्र मागू नये, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी दिले आहे.       पीककर्ज वाटपाची गती आधीच संथ असताना जिल्ह्यात पीककर्ज घेण्यासाठी बँकेत येणाऱ्या शेतकऱ्यांना विविध प्रमाणपत्रांची मागणी केली जात आहे. सातबारा, नमुना आठ अ, फेरफार, आधार कार्ड, सर्च रिपोर्ट, गहाण खताचे घोषणापत्र, शेतकरी राहत असलेल्या परिसरातील सर्व बँकांचे ना-देय (नो-ड्यूज) प्रमाणपत्र अशा विविध कागदपत्रांची पूर्तता शेतकऱ्यांकडून करून घेतली जात आहे. ही कागदपत्रे गोळा करताना शेतकऱ्यांना किमान चार ते पाच दिवस लागत असून पैसेही खर्च होत आहेत. त्यानंतर प्रकरण मंजुरीसाठी विलंब लागत आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात शेतकऱ्यांचा बराचवेळ जात आहे. यामुळे त्रस्त  झालेल्या अनेक शेतकऱ्यांकडून तहसीलदार, जिल्हाधिकारी, उपनिबंधकांकडे तक्रारी करण्यात आल्या. दोन दिवसांपूर्वी या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांची पीककर्ज वाटपाबाबत बैठक घेतली. या बैठकीत पीककर्ज मंजुरीसाठी कुठले प्रमाणपत्र द्यावे याबाबत धोरणच ठरविण्यात आले. यानुसारच बँकांनी कागदपत्रे घ्यावीत, असे स्पष्ट सांगण्यात आले. बँकांनी अनावश्यक कागदपत्रांची मागणी केल्यास तसेच पीककर्ज मंजूर करण्यास टाळाटाळ केल्यास शेतकऱ्यांनी तहसीलदार, सहायक निबंधक, जिल्हा उपनिबंधक तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविण्याचे आवाहनही केले आहे.

अशी कागदपत्रे द्यावी लागणार शेतकऱ्याने राष्ट्रीयीकृत, व्यापारी बँकांकडून पीककर्ज घेण्यासाठी अर्ज केला असल्यास त्यासोबत त्याने सातबारा, नमुना आठ अ, फेरफार, आधार कार्ड, दोन फोटो, लीगल सर्च रिपोर्ट (१ लाख ६० हजारांपर्यंत आवश्यक नाही. त्यावरील कर्जासाठी हवा), ना-देय प्रमाणत्राऐवजी स्टँप पेपरवर स्वयंघोषणापत्र, १ लाख ६० हजार रुपयांपर्यंत कर्जासाठी गरज नाही. त्यावरील कर्जासाठी दुय्यम निबंधकांकडे नोंदणीकृत केलेले गहाण खताचे घोषणापत्र द्यावे. 

जिल्हा बँकेच्या कर्जासाठी लागणारी कागदपत्रे  सातबारा, नमुना आठ अ, फेरफार, आधार कार्ड, दोन फोटो, एक लाख ६० हजारांवर पीककर्ज असेल, तरच ना-देय प्रमाण ५० हजार रुपयांपर्यंत पीककर्ज हवे असेल तर आवश्यक नाही. त्यावरील कर्जासाठी द्यावे तसेच गटसचिव व तलाठ्याच्या स्वाक्षरीचे प्रमाणत्र द्यावे लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com