शेतकरी उत्पादक कंपन्यांना पर्याय नाही: जिल्हाधिकारी श्रीकांत

मुरुडेश्वर कंपनीचे महेंद्र सवासे यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करताना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत.
मुरुडेश्वर कंपनीचे महेंद्र सवासे यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करताना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत.

लातूर : शेतकरी एकत्रित येऊन वाटचाल करीत नसल्याने शोषण करणाऱ्या व्यवस्था निर्माण झाल्या आहेत. त्याला तोंड देऊन सन्मानाने उभे राहायचे असल्यास शेतकरी उत्पादक कंपन्यांशिवाय पर्याय नाही. समविचारी लोकांनी एकत्र येऊन शेतीचे उत्पादन वाढविणे व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून प्रत्यक्ष उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले.  छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत एमएसडीपीच्या मूल्यवर्धित सेवा प्रकल्प आणि कार्यशाळेचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता. ३) डीपीडीसी सभागृहात झाले. याप्रसंगी ते बोलत होते. `सकाळ’च्या सिमॅसिस लर्निंग एलएलपी व पॅलेडियम इंडियाच्यावतीने राज्यभर सुरू असलेल्या शेतकरी कौशल्य विकास कार्यक्रमात प्रशिक्षित झालेल्या आणि शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी एपी ग्लोबालेचे कार्यकारी उपाध्यक्ष बॉबी निंबाळकर, पॅलेडियम इंडियाच्या अध्यक्षा श्रीमती बार्बरा स्टॅन्कोनिकोव्हा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे सहसंचालक राजू वाकुडे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपसरव्यवस्थापक आकाश मोरे, आत्माचे प्रकल्प संचालक डी. एल. जाधव, `अॅग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण, सकाळचे कार्यकारी संपादक संजय वरकड  यांची प्रमुख उपस्थिती होती.  या वेळी श्री. श्रीकांत म्हणाले, शेतकऱ्यांनी गट, तट व राजकारणापासून अलिप्त राहून आर्थिक उन्नतीसाठी एकत्र यायला हवे. एकत्र येऊन कंपनी स्थापन केल्यास शासन, विविध संस्था व बॅंकांच्या योजनांचा लाभ घेता येईल. यासंदर्भात शेतकरी गट व कंपन्यांच्या सदस्यांना जिल्हा प्रशासन आवश्यक मदत करेल. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून काम करणाऱ्या शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. कार्यशाळेची प्रस्तावना ‘अॅग्रोवोन’चे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी केली, तर प्रकल्पाचे सचित्र सादरीकरण अमित जोशी यांनी केले.  या अभियानात प्रशिक्षणानंतर नोंदणी झालेल्या दोन शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या अध्यक्षांना प्रमाणपत्रांचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले. यात मुरुडेश्वर व वडवळ नागनाथ शेतकरी उत्पादक कंपनीचा समावेश आहे. यानंतर कार्यशाळेत इरादापत्र दिलेल्या शेतकऱ्यांसोबत विपणनाची जोडसाखळी, अर्थव्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञांनी चर्चात्मक संवाद साधला. यानंतर सादर झालेल्या यशोगाथांमुळे उपस्थित शेतकऱ्यांना कंपनी नोंदणीसाठी प्रेरणा मिळाली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com