जम्मू-काश्‍मीरमध्ये महाविद्यालय सुरू, विद्यार्थी गैरहजर

जम्मू-काश्‍मीरमध्ये महाविद्यालय सुरू, विद्यार्थी गैरहजर
जम्मू-काश्‍मीरमध्ये महाविद्यालय सुरू, विद्यार्थी गैरहजर

श्रीनगर, जम्मू-काश्‍मीर : कलम ३७० हटविल्यानंतर काश्‍मीर खोऱ्यात बंद असलेले महाविद्यालय आज सुरू झाले. मात्र विद्यार्थी हजर न राहिल्याने प्रशासनाच्या प्रयत्नास यश आले नाही. दरम्यान, बुधवारी (ता. ९) ६६ व्या दिवशीही श्रीनगर शहरातील बहुतांश भागातील बाजारपेठ बंदच होती. 

जम्मू आणि काश्‍मीरचे विभागीय आयुक्त बशीर खान यांनी गेल्या आठवड्यात शाळा ३ ऑक्‍टोबर रोजी आणि महाविद्यालय ९ ऑक्‍टोबर रोजी सुरू करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज सकाळी महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी उपस्थिती दर्शविली, मात्र विद्यार्थी कॉलेजकडे फिरकले नाहीत. प्रशासनाने व्यापक पातळीवर प्रयत्न करूनही आणि पुरेशी सुरक्षा व्यवस्था असतानाही काश्‍मिरी महाविद्यालयीन विद्यार्थी घरीच बसले. 

यादरम्यान प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयात पाठविण्यासंदर्भात पालकांनाही आवाहन करण्यात आले होते. मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही. दुसरीकडे काश्‍मीर खोऱ्यातील जनजीवन ६६ व्या दिवशीही विस्कळितच राहिले. खासगी वाहनांची वाहतूक बंदच होती पण जहॉंगीर चौकात काही प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून आली. काही ठिकाणी सकाळी ११ वाजेपर्यंत दुकाने सुरू होती. त्यानंतर बाजारपेठेत शुकशुकाट झाला. 

दुकाने बंद असल्याची फेरीवाल्यानी संधी साधली. रेसिडेन्सी रोड आणि पोलो विव भागात फेरीवाले दिसून आले. खोऱ्यात लॅंडलाइन सेवा खोऱ्यातील सुरू आहे. त्याचबरोबर मोबाइल सेवा काही भागात सुरू असून, इंटरनेट सेवा अद्याप बंदच ठेवण्यात आली आहे. 

कृष्णाघाटीत पाकचा गोळीबार  पूँच जिल्ह्यातील सीमेलगत कृष्णाघाटी सेक्‍टरमध्ये पाकिस्तानने गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला. या वेळी भारतानेही पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख उत्तर दिले. या गोळीबारामुळे सीमावर्ती भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण झाले. पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असून, गेल्या दहा महिन्यांत २ हजार ५० वेळेस भारतीय सीमेवर गोळीबार केला आहे. त्यात २१ भारतीयांचा मृत्यू झाला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com