नगर ः कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेतून गेल्या वर्षभरापासून नवीन शेततळ्याची का
बातम्या
रंगीत कापसाचा प्रयोग यशस्वी
शेतीचा व्यासंग जपलेल्या मारेगाव येथील परवेज मुजफ्फर पठाण यांनी प्रायोगिक तत्त्वावर रंगीत कापसाचे उत्पादन घेतले आहे.
यवतमाळ ः शेतीचा व्यासंग जपलेल्या मारेगाव येथील परवेज मुजफ्फर पठाण यांनी प्रायोगिक तत्त्वावर रंगीत कापसाचे उत्पादन घेतले आहे. त्यांचा हा प्रयोग परिसरात चर्चेचा विषय ठरला असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर नैसर्गिक रंग असलेल्या कापसाला चांगला दर असल्यामुळे बीजोत्पादनाच्या माध्यमातून लागवड क्षेत्र ५० एकरांपर्यंत विस्तारण्याचा त्यांचा मनोदय आहे.
बुरांडा (ता. मारेगाव) येथील मिर्झा सलीम बेग हे परवेज पठाण यांचे नातेवाईक. मध्य प्रदेशातील एका महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या मिर्झा बेग यांनी शेती संशोधनात स्वतःला झोकून दिले होते. निवड पद्धतीने त्यांनी राजहंस नावाचे कापसाचे वाण विकसित करून शेतकऱ्यांना लागवडीसाठी दिले. या वाणाची उत्पादकता अधिक असल्याने शेतकऱ्यांकडूनही त्याला पसंती मिळाली होती. परंतु या वाणाचा व्यावसायिक वापर आणि विस्तार मिर्झा सलीम बेग यांना करता आला नाही. त्यांच्याकडूनच रंगीत कापसाचे बियाणे परवेज मुजफ्फर पठाण यांना मिळाले.
बारा वर्षांपूर्वी पांढऱ्या कापसात खाडे (गॅप) भरण्याकामी याचा वापर परवेज पठाण करायचे. त्या वेळी रंगीत कापसाला मागणी नसल्यामुळे खाडे भरण्यापुरताचा त्याचा वापर होत होता. आता मात्र जागतिक आणि स्थानिकस्तरावर नैसर्गिक रंग असलेल्या कापसाला मागणी वाढली. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने रंगीत कापूस वाणाच्या बीजोत्पादनाचा करार ‘महाबीज’ आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासोबत केला आहे. या बाबतची माहिती मिळाल्यानंतर परवेज पठाण यांनी देखील आता रंगीत कापसाचे व्यावसायिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला.
थेट लागवड शक्य
सरळ वाण असल्यामुळे याची थेट लागवड शक्य आहे. सुमारे ५० एकरांत त्याची लागवड येत्या हंगामात करण्याचा त्यांचा विचार असून, त्याकरिता कुटुंबाच्या १० एकर शेतीसोबतच उर्वरित क्षेत्र करारावर केले जाणार आहे. परवेज पठाण यांचा हा प्रयोग आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यासाठी गेमचेंजर ठरणार का, हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.
प्रतिक्रिया
केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने रंगीत कापूस लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कापसाच्या उत्पादनाला चांगले भविष्य असल्याची बाब हेरत येत्या हंगामात ५० एकरांपर्यंत रंगीत कापसाच्या लागवडीचा निर्णय घेतला आहे.
- सलीम शेख, शेतकरी
- 1 of 1548
- ››