निसर्गाच्या साक्षीने रंगली गोष्ट एका लग्नाची 

सातपुड्याच्या डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या सालईबन नावाच्या गावात दोन दिवसांपूर्वी अनोखा विवाह सोहळा पार पडला. उच्च शिक्षित तरुण-तरुणीने आदिवासींच्या उपस्थितीत, पर्यावरण संरक्षणाचे काम करीत विवाह केला.
The colorful story of a wedding witnessed by nature
The colorful story of a wedding witnessed by nature

अकोला ः सातपुड्याच्या डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या सालईबन नावाच्या गावात दोन दिवसांपूर्वी अनोखा विवाह सोहळा पार पडला. उच्च शिक्षित तरुण-तरुणीने आदिवासींच्या उपस्थितीत, पर्यावरण संरक्षणाचे काम करीत विवाह केला. विषमुक्त भोजन, रानभाज्या, विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती असलेला हा विवाह सोहळा सध्या एकच चर्चेचा ठरला आहे. संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील प्रगतशील शेतकरी गुलाबराव मारोडे यांचा मुलगा प्रताप व अंबाजोगाई तालुक्यातील उजनी येथील प्रदीपराव कवडे यांची कन्या पद्मजा यांनी हा अनोखा निर्णय घेत जीवनभराची गाठ बांधली.  बुलडाणा जिल्ह्यात गुलाबराव मारोडे हे प्रयोगशील शेतीसाठी प्रख्यात शेतकरी आहेत. त्यांचा मुलगा प्रताप हा उच्च शिक्षित कृषी पदवीधर आहे. तो सामाजिक, पर्यावरणविषयक चळवळीत सक्रिय आहे. नोकरी न करता शेती व पर्यावरणासाठी त्याने वाहून घेतले आहे. आपल्या विवाहात कुठल्याची अनावश्यक रूढी, बडेजाव, खर्च न करता विधींना विधायकतेचे रूप देत हा त्याने विवाह करण्याचा निर्णय घेतला. प्रताप हा तरुणाई फाउंडेशनचा कार्यकर्ता आहे. तरुणाई फाउंडेशनच्या पुढाकाराने जळगाव जामोद तालुक्यातील असलेल्या सातपुड्यातील सालईबन या गावशिवारात पर्यावरणाचे मोठे काम उभे राहलेले आहे. प्रतापच्या विवाहाच्या आयोजनाची जबाबदारी साहजिकच तरुणाई फाउंडेशनने स्वीकारली. पद्मजा आयटी इंजिनिअर असून, तिनेही अशा पद्धतीने विवाहास होकार दिला आणि ठरल्यानंतर २८ नोव्हेंबरला हा सोहळा झाला.  प्रतापने सेंद्रिय विषमुक्त शेतीची कास धरली आहे. शेतीमाल अडतीत न पाठवता तो स्वतः मार्केटिंग करतो. शेतातील शुद्ध भाजीपाला स्वतः बाजारात नेऊन व्यापाऱ्यांच्या बाजूला बसून विकतो. त्याला आता लाखो रुपयांचे पॅकेज देणाऱ्या आयटी क्षेत्रातील नोकरी व पुण्यासारख्या मेट्रो सिटीतील उच्च तारांकित लाइफ स्टाइल बाजूला सारत खेड्यात आलेली पत्नी पद्मजा मिळाली. पाणी फाउंडेशनच्या राज्यस्तरीय टीममध्ये सोबत काम करताना दोघांचे आचार-विचार जुळले. घरून स्वातंत्र्य भेटले होते. तरीही घरच्यांची संमती मिळाल्यानंतरच दोघांनी नवजीवनाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. 

‘निसर्गाच्या साक्षीने विवाह’  ‘निसर्गाच्या साक्षीने विवाह’ असं शीर्षक असलेली पत्रिका बनवली. वऱ्हाडी मंडळींना ‘श्रमदानरूपी आशीर्वादासाठी निमंत्रण’ देणारा मजकूर या पत्रिकेत छापला. लग्न म्हटले, की दारासमोर, मंदिराच्या, शाळेच्या प्रांगणात, मंगल कार्यालय, लॉन्स, हॉटेल, असे आपल्या कुवतीनुसार स्थळे ठरतात. पण हे ठिकाण होते डोंगर, जंगल, शेती, आदिवासी पाडे, वन्यजीवांचा अधिवास अशा चहूबाजूंनी असलेल्या निसर्गरम्य वातावरणात सातपुडा डोंगराच्या पायथ्याशी. आचार्य विनोबांच्या भूदान यज्ञातील आणि महात्मा गांधी लोकसेवा संघाच्या जमिनीवर वसलेल्या सालईबन या पर्यावरण ग्रामात हा सोहळा संपन्न झाला. 

श्रमदान करून बांधले दोन बंधारे  लग्न लागण्यापूर्वी वर-वधू आणि वऱ्हाडी मंडळींनी श्रमकार्य करून दोन बंधारे बांधले. तब्बल २ तास श्रमदान करून हे जोडपे मांडवात आले. दोघांची वरात दमणीमध्ये निघाली. धान्याची नासाडी होऊ नये म्हणून अक्षतांऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर केला गेला. झाडांच्या बिया, भाजीपाल्याच्या बियाण्यांचे कागदी पाकिटे मंडपातील लोकांना वाटले. गुरुदेव सेवा मंडळाच्या पद्धतीचे मंगलाष्टके झाली. दुपारी संविधानाची साक्ष घेऊन आणि हातात तिरंगा ध्वज ठेवत वर-वधुंनी एकमेकाला स्वीकारले. महात्मा जोतिबा फुले यांचा स्मृतिदिन असल्याने त्यांच्यावरील ‘क्रांतीसूर्य’ या ग्रंथाचे विमोचनही त्यांच्या हस्ते झाले. विवाहासाठी उभारलेल्या स्टेजवर शेती अवजारे, जाते, पाटे, उतरंड, तांब्याची भांडी, असे साहित्य मांडण्यात आले होते. ग्रामीण जीवन साहित्य, देशी बियाणे, आदिवासी पारंपरिक वाद्य अशा विविध प्रदर्शनी मंडपात लावलेल्या होत्या. बांबूंचे गेट उभारलेले होते. 

वऱ्हाडींना दिले विषमुक्त जेवण  लग्नातल्या जेवणाचे सर्व पदार्थ होते विषमुक्त. मारोडे परिवाराने स्वतःच्या शेतातील विषमुक्त अन्नधान्य, भाजीपाला वापरला. तांदूळ छत्तीसगडचा तर केमिकल विरहित गूळ गुजरातचा, शुद्ध तुप, रानभाजी म्हणून सुरण, आंबाड्याची चटणी आणि हे सर्व होतं केळीच्या पानावर, असं खऱ्या अर्थाने आरोग्यदायी जेवण वऱ्हाडी मंडळींना दिले. बँड ऐवजी सनई चौघडा ठेवण्यात आला. खर्च टाळून सालईबनातील पर्यावरण कार्यासाठी २५ हजार रुपयांचा धनादेश नवपरिणीत जोडप्याने तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण पिठोरे पाटील, उपाध्यक्ष विठ्ठल पवार, कोषाध्यक्ष अविनाश सोनटक्के, डॉ. राजेश मिरगे यांना प्रदान केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com