जनादेश घेऊनच पुन्हा सत्तेवर येऊ : मुख्यमंत्री फडणवीस

जनादेश घेऊनच पुन्हा सत्तेवर येऊ ः मुख्यमंत्री फडणवीस
जनादेश घेऊनच पुन्हा सत्तेवर येऊ ः मुख्यमंत्री फडणवीस

नगर ः ‘‘राज्याच्या जनतेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची मुजोरी अनुभवली आहे, त्यामुळे पुढील पंचवीस वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात व राज्यात भाजपची सत्ता राहील. मोदी बलशाली राष्ट्रनिर्माणाचे महान कार्य करीत आहेत. आम्ही समृद्ध महाराष्ट्र तयार करण्याचे काम तुमच्या आशीर्वादाने करीत आहोत. तुमचा जनादेश घेऊन मुंबईत जाऊन आणि पुन्हा सरकार स्थापन करून तुमच्या भेटीला येईन,’’ असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

महाजनादेश यात्रेनिमित्त पाथर्डी (जि. नगर) येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. पालकमंत्री राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे, आमदार शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड, सुरजितसिंग ठाकूर व मोनिका राजळे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, भाऊसाहेब वाकचौरे उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, ‘‘राज्याला वारी व यात्रेची परंपरा जुनीच आहे. पंढरपूरच्या यात्रेला जाऊन आपण विठोबाचे दर्शन घेतो, त्याप्रमाणे जनता हे आमचे दैवत आहे आणि दैवताच्या दर्शनासाठी मी राज्यभर महाजनादेश यात्रा करतोय. विरोधात असताना संघर्षयात्रा आणि सत्तेत असताना जनसंवादयात्रा काढण्याचे काम आम्ही केले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला पायचीत केले आहे. त्यांना जनतेच्या दारात जावे लागते, हे सत्ता गेल्यावर समजले हे बरे झाले.’’ 

‘‘राज्यावर खूप संकटे आली. दुष्काळ, अतिवृष्टी, बोंड अळी यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, विमा व अनुदान अशा उपाययोजना केल्या. पावणेतीन लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. आणखीही ही योजना सुरू आहे. शेतकऱ्यांना थेट खात्यामध्ये मदत म्हणून पन्नास हजार कोटी रुपये दिले. सिंचनाच्या योजनांना व जलसंधारणासाठी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला मोठा निधी दिला. पश्‍चिमवाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून १६७ टीएमसी पाणी मराठवाडा न पश्‍चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला देऊ. शेवगाव- पाथर्डी शहरांच्या पिण्याच्या पाणी योजनेला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे देऊन तीस हजार किलोमीटरचे रस्ते पाच वर्षांत तयार केले. गरिबांना घरे देण्याचे काम केले. पुढील तीन वर्षांत एकही माणूस बेघर राहणार नाही. अतिक्रमणे नियमित करून मालकी हक्क दिले आहेत. ऊसतोड महामंडळाकडून पुढील काळात तोडणी कामगारांना घरे देण्याचे काम करू. तोडणी कामगारांच्या मुलांसाठी पाथर्डीत वसतिगृह बांधायला निधी देऊ, शैक्षणिक सुविधा पुरवू.’’

लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि माजी आमदार दिवंगत राजीव राजळे यांची आठवण काढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘पाथर्डीत आल्यावर दोघांची आठवण मला येते. (स्व.) मुंडे यांचे पाथर्डी तालुक्‍यावर विशेष प्रेम होते. त्यांच्या बोटाला धरूनच राजकारणात आलो. त्यांनी आम्हाला संघर्षाची शिकवण दिली. माझे मित्र (स्व.) राजीव राजळे यांची आठवण मनाला वेदना देते.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com