कापूस पिकात यांत्रिकरणासाठी तज्ज्ञांनी पुढाकार घ्यावाः कृषिमंत्री भुसे 

कापूस हे राज्याचे महत्वाचे पीक आहे. या पिकात यांत्रिकीकरण वाढविण्याच्या दृष्टीने शास्त्रज्ञांनी प्रयत्न करावेत.
cotton
cotton

अकोला ः कापूस हे राज्याचे महत्वाचे पीक आहे. या पिकात यांत्रिकीकरण वाढविण्याच्या दृष्टीने शास्त्रज्ञांनी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांना उपयोगी तंत्रज्ञान निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी केले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा खरीप हंगाम येऊ घातला आहे. या हंगामात कापूस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे राज्यस्तरीय कापूस कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कृषीमंत्री दादा भूसे यांच्याहस्ते कार्यशाळेचे उदघाटन झाले. कुलगुरु डॉ. विलास भाले हे या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होते.  विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या बहुतांश भागात कापूस पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या पिकासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या शिक्षण विस्तार संचालनालयाद्वारे हे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे तथा अटारी पुणेचे संचालक डॉ. लाखनसिंग, डॉ. गोविंद वैराळे, कापूस उत्पादक शेतकरी गणेश नानोटे, विजय इंगळे यांच्यासह इतर सहभागी झाले होते. 

कृषीमंत्री भुसे हे जळगाव खानदेश येथून ऑनलाइन पद्धतीने या कार्यशाळेत सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी कापूस पिकासाठी यांत्रिकीकरण महत्वाचे असल्याची बाब मान्य करीत प्रामुख्याने कापूस वेचणीच्या अनुषंगाने कृषी विभाग काम करेल असे सांगितले. विद्यापिठाच्या शास्त्रज्ञांनी यादृष्टीने काम केले तर खर्च कमी होईल. शेतकऱ्यांनी, कापूस तज्ज्ञांनी याबाबतच्या सूचना कृषी विभागाकडे मांडाव्यात. त्याचा गांभिर्याने विचार केला जाईल. अशाच प्रकारे गुलाबी बोंड अळीवर नियंत्रणासाठीच्या सूचना, आपले अनुभव कृषी खात्याकडे मांडण्याचे आवाहनही त्यांनी तज्ज्ञांना केले. 

यावेळी गोविंद वैराळे यांनी कापसाच्या वेचणीचा खर्च वाढलेला असल्याची बाब मांडली. कापूस वेचणी खर्चावर मात करण्यासाठी हॅन्ड ऑपरेटींग यंत्र उपलब्ध करून दिले पाहिजे, अशी सूचना केली. यावर कृषी आयुक्त दिवसे यांनी हा मुद्दा योग्य असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी उत्पादन खर्च कमी करावा लागेल. यासाठी यंत्र संशोधन सुरु आहे. तरीही बोंड काढणारे यंत्र अजून विकसित झालेले नाही. हे एक मोठे आव्हान आहे. यांत्रिकीकरणाच्या अंमलबजावणीत कापूस लागवडीत एकसुत्रिपणा नसणे, हा मुख्य अडथळा झालेला आहे. आपल्याकडे जमिन, वाण लागवडीत वैविध्यता आहे. त्यामुळे यांत्रिकिकरणाला मर्यादा आलेल्या आहेत. याबाबत विद्यापिठाच्या शास्त्रज्ञांनी यंत्र संशोधनासाठी पुढाकार घेतला पाहिजे. कृषी विभाग यासाठी योग्य ते सहकार्य करेल, असे आश्‍वासन दिले.  कापूस उत्पादक शेतकरी विजय इंगळे यांनी बोंडअळीसाठी सर्व उपाययोजना केल्या जात असूनही बोंडअळी पुर्णपणे कंट्रोलमध्ये येत नाही. यासाठी तंत्रज्ञान मिळायला हवे,अशी मागणी केली. तर गणेश नानोटे यांनी जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शासनस्तरावरून उपाययोजनांची गरज व्यक्त केली. कुलगुरु डॉ. भाले यांनी विद्यापिठस्तरावर सुरु असलेल्या प्रकल्पांची, संशोधनाची माहिती दिली. तसेच कुलगुरु डॉ. के. पी. विश्‍वनाथा, डॉ. अशोक ढवण यांच्यासह इतर तज्ज्ञांनीही सहभाग घेत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. दिलीप मानकर यांनी केले. सूत्रसंचालन विद्यापिठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले. तांत्रिक सत्रात विद्यापिठाच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.  महाकॉट प्रकल्पासाठी १०० कोटींची तरतुद  कापूस उत्पादन सुधारण्यासाठी महाकॉट हा प्रकल्प हातात घेतला असून त्यासाठी १०० कोटींची तरतूद केल्याचे आयुक्त दिवसे यांनी सांगितले. या प्रकल्पाद्वारे एकाच प्रकारचा चांगला कापूस मिळेल. दर्जेदार कापूस मिळाल्याने योग्य भाव मिळेल. यासाठी आवश्‍यक तंत्रज्ञानाचा वापर या प्रकल्पातून होईल. १२ जिल्हयातील ६० क्लस्टरमध्ये याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहितीही आयुक्तांनी यावेळी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com