एकत्र येऊया, मार्ग काढूया !

एकी
एकी

शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रांतील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी सकाळ माध्यम समूहाने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषी प्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-महिलांच्या उत्थानासाठी समाजातील सेवाभावी व्यक्‍ती व संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्यामुळे महाराष्ट्राचे समाजमन अस्वस्थ आहे. केवळ मराठाच नव्हे तर अन्य समाजही विविध मागण्यांसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. खरेतर सगळ्याच समाजाचे प्रश्‍न पोटापाण्याशी संबंधित आहेत. शेती योग्य पद्धतीने न केल्याने ती संकटात आहे व त्यामुळे तिच्यावर अवलंबून असलेले समाजघटक अधिक अस्वस्थ आहेत, तर शिक्षण व नोकरी-उद्योगांसाठी आवश्‍यक असलेले कौशल्य आत्मसात करणे अवघड बनल्यामुळे मुलामुलींचे पालक चिंतेत आहेत. अशावेळी, एकूणच समाजाची अस्वस्थता वाढविणाऱ्या वर्तमानातील प्रश्‍नांवर तोडगा काढण्याबरोबरच भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी समाजानेच एकत्र यावे, केवळ सरकारवर अवलंबून राहण्याची मानसिकता बदलावी, यासाठी हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे.  हे अभियान कोणत्याही जातीधर्मापुरते मर्यादित नसून गरजूंना मदत करण्यासाठी सर्वच समाजघटकांनी पुढे यावे, अशी अपेक्षा आहे.  या दृष्टीने येत्या काही दिवसांत सकाळच्या माध्यमातून समाजातील गरजू तरूण, महिला व अन्य घटक आणि   त्यांना मदत करू इच्छिणाऱ्या सेवाभावी व्यक्‍ती व संस्थांना एकत्र आणणारी एक व्यवस्था उभी केली जाईल. ग्रामीण व शहरी भागात कौशल्यविकास व स्टार्टअपस उभारणीचे प्रयत्न केले जातील. त्यासाठी आवश्‍यक सरकारी धोरण व निर्णयांसाठी राज्य व केंद्र सरकारबरोबर काम केले जाईल. सकाळ-अॅग्रोवन हे शेतीला वाहिलेले देशातील एकमेव दैनिक आणि तनिष्का स्त्रीप्रतिष्ठा अभियान हे महिलांसाठी, तर यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क हे युवकांचे व्यासपीठ, नैसर्गिक आपत्तीच्या काळात समाजाच्या मदतीला धावून जाणारे सकाळ रिलीफ फंड व सकाळ सोशल फाउंडेशन अशा परंपरेतील हे नवे व्यासपीठ उपलब्ध करण्यात येणार असून तेथे मदतीची गरज असलेल्यांची नोंदणी केली जाईल आणि त्यांना मदत करू इच्छिणाऱ्या सेवाभावी व्यक्‍ती व संस्थांची सांगड घातली जाईल.  विशेषत: महाराष्ट्रात शेतकरी उत्पादक कंपन्यांची उभारणी आणि त्यामाध्यमातून निर्यात व कृषी प्रक्रिया उद्योगांना मोठा वाव असल्याने त्याकडे विशेष लक्ष देण्यात येईल. सकाळ-अॅग्रोवनच्या स्मार्ट व्हीलेज प्रकल्पाला जोडून राज्याच्या विविध भागात अशा कंपन्यांसाठी तरूण शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल. त्यांना प्रशिक्षित करण्यात येईल आणि वित्तपुरवठ्यापासून ते निर्यातक्षम उत्पादनांपर्यंत त्यांना विविध टप्प्यांवर मदत करणारी यंत्रणा उभारली जाईल. 

भविष्यातील आव्हानांचा वेध  केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे   तर जगभर नोकऱ्यांचे स्वरूप बदलत   आहेत. पारंपरिक नोकऱ्या जाऊन नव्या येत आहेत. यांत्रिकीकरणासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रामुळे ही समस्या पुढे   आणखी जटील बनणार आहे. केवळ कार्यालयीन किंवा कारखान्यातील कामच नव्हे तर  अन्य व्यवसायही धोक्‍यात आहेत. या सगळ्यांचा विचार करून आपली शिक्षण, नोकरी, व्यवसायाची भविष्यातील दिशा निश्‍चित करावी लागणार आहे. ही जबाबदारी सरकारसोबतच समाजाचीही असल्याने तरूणांना अपारंपरिक नोकरी-व्यवसायाकडे, स्टार्टअप संस्कृतीकडे नेण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जाईल. यासोबतच केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत केल्या जाणाऱ्या नियुक्‍त्या किंवा पोलिस, कृषी सहाय्यक, शिक्षक, आरोग्यसेवक वगैरे ज्या तत्सम नोकऱ्या उपलब्ध आहेत, त्यादेखील अंतिमत: गुणवत्तेच्या आधारावरच मिळणार असल्याने ती  गुणवत्ता विकसित करण्याचाही प्रयत्न केला जाईल.  आपण ही सेवा देऊ शकता...

  • समाजाचे आपण काही देणे लागतो, या कृतज्ञ भावनेतून गरीब मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊ शकता
  • जे जे आपल्याला ठावे, ते इतरांना शिकवावे, या उक्‍तीनुसार तरुण-तरुणींच्या कौशल्यविकासासाठी वेळ देऊ शकता
  • आयुष्यात चाकोरीबाहेरचे काही करू पाहणाऱ्या नव्या पिढीला नव्या संधी निर्माण करू शकता. 
  • शेतीमालावरील प्रक्रिया व अन्य उद्योग उभारणीसाठी सकाळच्या पुढाकाराने छोटेछोटे मेळावे घेऊ शकता
  • आपले गाव, तालुका, जिल्हा स्तरांवर स्टार्टअप्स उभारू इच्छिणाऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत, गुंतवणूक करू शकता
  • शिक्षण संस्थांमध्ये गुणवान युवक-युवतींसाठी इन्क्‍युबेशन व इनोव्हेशनची सुविधा निर्माण करू शकता
  •                                                                          - संपादक

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com