नगरमध्ये निवडणुकीत वैयक्तिक पातळीवर टीका-टिप्पणी

नगरमध्ये निवडणुकीत वैयक्तिक पातळीवर टीका-टिप्पणी
नगरमध्ये निवडणुकीत वैयक्तिक पातळीवर टीका-टिप्पणी

नगर ः राज्याच्या राजकारणात सातत्याने चर्चेत राहिलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात नेमकं काय होणार याचीच सध्या नगर जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू आहे. गेल्या आठ दिवसांपासून प्रचाराची राळ उठली आहे. मात्र, प्रचाराच्या मुद्यात मतदारसंघाच्या विकासाबाबत चर्चा करण्याएेवजी वैयक्तिक पातळीवर टीका-टिप्पणी केली जात आहे. त्यामुळे दुष्काळाने होरपळत असलेल्या नगर जिल्ह्यामधील लोकांचे हाल सुरूच आहेत. 

नगर लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते व काॅँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील यांनी तयारी केली. मात्र, जागा राष्ट्रवादीकडे असल्याने व ही जागा प्रयत्न करूनही मिळाली नसल्याने डॉ. सुजय यांनी भाजपात प्रवेश करून उमेदवारी मिळवली. राष्ट्रवादीने आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली. प्रचाराला मतदारसंघात जोरदार सुरवात झाली. सभा, मेळावे, शक्य तेथे शक्ती प्रदर्शनातून आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

‘‘काॅँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी असली तरी नगरमध्ये राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही, आणि नगरमध्ये प्रचाराला जाणार नाही.’’ असे सांगितल्यावर काही दिवसांतच राधाकृष्ण विखे पाटील प्रचारात सक्रिय असल्याचे दिसत आहेत. त्यांनी मतदार संघातील बहूतांश भागात बैठका घेतल्या आहेत. नेत्यांच्या सभा होत आहेत. मात्र प्रचारात मतदार संघाच्या विकासासाठी महत्त्वाचे रखडलेले प्रश्न, शेती, सिंचन आदी विषयासह सध्या दुष्काळामुळे सुरू असलेली होरपळ यावर उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्याएेवजी वैयक्तिक पातळीवर टीका करून उणे-दुणे काढले जात आहेत. 

प्रचारातूनच ज्येष्ठ नेत्यांवरही टीका केली जात आहे. त्यामुळे मतदारसंघात हा चर्चेचा विषय बनला असून अनेक जाणकार मंडळी सध्या सुरू असलेल्या प्रचाराच्या मुद्यावर चर्चा करत आहेत. नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळ आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात येत असलेल्या तालुक्यातच दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. चार महिन्यांपासून कसरत सुरू असताना, दुष्काळ जाहीर होऊन पाच महिन्यांचा कालावधी उलटला असताना अजूनही अनेक गावांत चारा छावण्या सुरू झालेल्या नाहीत.

हे आहेत प्रमुख प्रश्न नगर लोकसभा मतदारसंघात शेतीच्या पाण्याचा प्रश्न, रस्ते, आरोग्य सुविधा, नगर शहरातील उड्डाण पुलाचा प्रश्न, नगर-बीड-परळी रेल्‍वेमार्गाचे काम, साकळाई पाणी योजना, वांबोरी पाणी योजनेचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, पाणी योजना, दुष्काळी भागासाठी कायमस्वरूपी उपाययोजना असे अनेक स्थानिक प्रश्न असून त्याबाबत मात्र निवडणूक प्रचारात बोललेच जात नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com