नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
ताज्या घडामोडी
केंद्रीय पथक आज मराठवाड्यात पीक नुकसानीची पाहणी करणार
औरंगाबाद : मराठवाड्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राची समिती शुक्रवारपासून (ता. २२) रविवारपर्यंत (ता. २४) मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राची समिती शुक्रवारपासून (ता. २२) रविवारपर्यंत (ता. २४) मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार आहे.
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवेळी व अतिवृष्टीमुळे राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्यांतील शेती पिकाचे नुकसान झाले होते. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली १६ नोव्हेंबरला बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार शेतीपिकासाठी प्रति हेक्टरी ८ हजार व बहुवार्षिक फळबागांसाठी प्रति हेक्टरी १८ हजार दराने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शासनाने १८ नोव्हेंबरला शासन आदेश निर्गमित केला आहे.
दिली जाणारी ही मदत तोकडी असल्याचे राज्यातील अनेक नेत्यांनी केंद्र सरकारला कळवून मदत करण्याची विनंती केली होती. त्यानुषंगाने तातडीने केंद्र सरकारची समिती राज्याच्या दौऱ्यावर येते आहे. मराठवाड्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी येणाऱ्या द्विसदस्यीय समितीमध्ये डॉ. व्ही. तिरूपुगल व डॉ. के मनोहरन यांचा समावेश आहे.
शुक्रवारी (ता. २२) सकाळी विभागीय आयुक्तालयात या समितीसमोर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची माहिती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर सादर करतील. त्यानंतर समिती औरंगाबाद जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी रवाना होईल. शनिवारी (ता. २३) समिती बीड जिल्ह्यात तर रविवारी (ता. २४) जालना जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
समितीचा दौरा नेमका कसा हे निश्चित करण्याचे काम गुरुवारी (ता. २१) सुरू होते. मराठवाड्यात अतिवृष्टी व अवेळी पावसाने आठही जिल्ह्यातील ४१ लाख ४९ हजार १७५.३० हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या मदतीसाठी २९०४ कोटी ४० लाख ४३ हजार रुपयांचा निधी अपेक्षित आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यासाठी ४२६ कोटी ३३ लाख ७९ हजार, जालना ३९८कोटी ८६ लाख ६८ हजार, परभणी ३१२ कोटी ४४ लाख ४६ हजार, हिंगोली १८८ कोटी १८ लाख २० हजार, नांदेड ४३० कोटी ९९ लाख ८० हजार, बीड ५१४ कोटी ८० लाख ६७ हजार, लातूर ३५६ कोटी २ लाख ३२ हजार तर उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अपेक्षित २७६ कोटी ७४ लाख ५२ हजार रुपयांच्या निधीचा समावेश होता.
या अपेक्षित निधीच्या तुलनेत पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यासाठी ८१९ कोटी ६३ लाख ८ हजार रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. झालेले नुकसान व मिळणारी मदत पाहता केंद्रीय समितीच्या पाहणीनंतर नुकसानीच्या मदतीत वाढ केली जाईल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.
शुक्रवारी (ता. २२) सकाळी केंद्रीय समिती औरंगाबाद तालुक्यातील चौका येथून समितीच्या नुकसान पाहणीला सुरवात होईल. यानंतर फुलंब्री तालुक्यातील पाल, पाथरी, नायगाव, सिल्लोड तालुक्यातील गेवराई सेमी, पिंपळगाव पेठ, भराडी, बोरगाव बाजार, कन्नड तालुक्यातील आडगाव पिशोर, नाचनवेल, वासडी, हस्ता आदी गाव शिवारातील सोयाबीन, मका, बाजरी, कपाशी या पिकाचे अवेळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची समिती पाहणी करणार आहे. तसेच शेतकऱ्यांशी संवादही साधणार आहेत.
- 1 of 1028
- ››