आपत्ती व्यवस्थापनासाठी एकत्रित काम करण्याची आवश्यकता

आपत्ती व्यवस्थापनासाठी एकत्रित काम करण्याची आवश्यकता
आपत्ती व्यवस्थापनासाठी एकत्रित काम करण्याची आवश्यकता

मुंबई: दुष्काळ, चक्रीवादळ, पूरस्थिती आदी आपत्तींचे धोके कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र काम करण्याची गरज व्यक्त करून चौथ्या जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषदेचा समारोप शुक्रवारी (ता.१) झाला. या परिषदेतील ‘वचनांना प्रत्यक्ष कार्यात आणण्याचा’ संकल्पही जाहीरनाम्याद्वारे या वेळी करण्यात आला. महाराष्ट्र शासन, केंद्र शासन, डिझास्टर मॅनेजमेट इनिसेटिव्ह अँड कर्नव्हर्जन्स सोसायटी, आयआयटी बॉम्बे, टाटा समाज विज्ञान संस्था यांच्या सहयोगाने पवई येथील कॅम्पसमध्ये चौथ्या जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. चार दिवसांच्या या परिषदेचा समारोप राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संचालक दौलत देसाई, यूएनआयएसडीआरच्या विज्ञान व तंत्रज्ञान सल्लागार समितीचे चेअरमन व जपानच्या कैवो विद्यापीठाचे प्राध्यापक राजीब शॉ, डीएमआयसीएसचे पी. जी. धर चक्रवर्ती, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर, प्रा. जानकी अंधारिया, आयआयटी बॉम्बेचे प्रा. रवी सिन्हा उपस्थित होते. जागतिक परिषदेच्या निमित्ताने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यानुसार, आपत्ती निवारणासाठी पुढाकार घेणे, त्याबाबतची जागरूकता वाढविणे आणि जोखमीची माहिती देऊन योग्य पद्धतीने आपत्ती निवारणाचे कार्य करणे व या कार्याचा नियमित आढावा घेण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच स्थानिक प्रशासन आणि समाजाचे सक्षमीकरण करून प्रभावीपणे आपत्ती निवारणाचे काम करण्याचेही या जाहीरनाम्याद्वारे ठरविण्यात आले. मेधा गाडगीळ म्हणाल्या, की चार दिवसांच्या या परिषदेत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. विविध शासकीय अधिकारी व अभ्यासकांच्या विचारमंथनातून आपत्ती निवारणासाठी कार्य करण्याचा संकल्प ठरविण्यात आला. प्रा. शॉ म्हणाले, की आपत्ती निवारणाचे काम आपल्या सर्वांचे काम आहे, ही भावना निर्माण होणे आवश्यक आहे. आपत्ती जोखीम कमी करण्याच्या क्षेत्रात अनेक नावीन्यपूर्ण कल्पनांना वाव मिळणार आहे. २०२५ नंतर होणाऱ्या आपत्ती जोखीम निवारण कार्यक्रमात विकास प्रक्रियेला महत्त्व प्राप्त होणार आहे. कृषी, नगर विकास आदी क्षेत्रांतील आपत्ती निवारणासाठी बौद्धिक योगदान महत्त्वाचे असल्याचे श्री. देऊळगावकर यांनी या वेळी सांगितले. चार दिवसांच्या या परिषदेत जगभरातील सुमारे पन्नास देशांतील १ हजारांहून अधिक तज्ज्ञ सहभागी झाले होते. यामध्ये बांगलादेश, अमेरिका, जपान, जर्मनी, ब्रिटन, नेपाळ, नेदरलँड, स्पेन, ब्राझील, थायलंड, आइसलॅन्ड, दक्षिण आफ्रिका, फिलिपाइन्स, श्रीलंका या देशातील प्रतिनिधींचा समावेश होता. परिषदेच्या आयोजनात भारत सरकार, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राष्ट्रीय आपत्ती प्रशिक्षण संस्था, विविध राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे, संयुक्त राष्ट्र संघटनेतंर्गत यूएनडीपी, युनिसेफ, युनिस्केप, यूएनएसडीआर, जागतिक आरोग्य संघटना (WHO) इत्यादी संस्था त्याचप्रमाणे खासगी क्षेत्रातील एफआयसीसीआय व सीआयआय या संस्थांसह विविध विद्यापीठे, तांत्रिक संस्था सहभागी झाल्या होत्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com