युरिया पोच करण्यास खत कंपन्यांचा नकार

युरिया पोच करण्यास खत कंपन्यांचा नकार
युरिया पोच करण्यास खत कंपन्यांचा नकार

जळगाव : जिल्ह्यात युरियाची पोच (वाहतूक खर्च) करण्यासाठी दोन खत कंपन्या नकार देत आहेत. परिणामी, विक्रेते (होलसेलर) हा खर्च उचलतात. मग आपले मार्जीन (नफा) कमी व्हायला नको म्हणून ग्रामीण भागात जादा दर आकारले जात असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित कंपन्यांना मध्यंतरी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने ताकीद दिली, तरीही या कंपन्या आपल्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करीत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.  युरिया खताबाबत या दोन आघाडीच्या कंपन्या रेल्वे मालधक्‍क्‍यापासून ते विक्रेत्यापर्यंत हे खत पोचविण्यासाठी वाहतूक भाडे विक्रेत्यांना खर्च करायला लावतात. हा वाहतूक खर्च कंपन्यांना किलोमीटरच्या निकषानुसार अनुदान म्हणून मिळतो, परंतु हा खर्च मिळायला वरिष्ठ पातळीवरून (खते विभाग) मिळायला विलंब होतो. त्यासाठी बिले व इतर सर्व किचकट प्रक्रिया पार पाडायच्या असतात, म्हणून या कंपन्या विक्रेत्यांनाच सुरवातीला हा खर्च करायच्या सूचना देतात. चाळीसगाव, अमळनेर, जामनेर, रावेर, बोदवड, मुक्ताईनगरपर्यंत युरियाची एक गोणी जळगावच्या मालधक्‍क्‍यावरून नेण्यासाठी जवळपास १५ रुपये भाडे विक्रेत्यांना द्यावे लागते. मग हे भाडे विक्रेते शेतकऱ्यांकडून जादा दर आकारून वसूल करतात. यात शेतकऱ्यांची लूट होत आहे. हा प्रकार कृषी विभागाच्या लक्षात आल्यानंतर संबंधित कंपन्यांना पत्र देऊन विचारणा केली, परंतु अजूनही संबंधित कंपन्यांनी आपल्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा केलेली नाही. 

विक्रेत्यांना युरियाच्या एक गोणीमागे आठ ते १० रुपये नफा मिळतो. त्यावर संबंधित खत कंपन्या आणखी इतर विद्राव्य, सूक्ष्मअन्नद्रव्ये विक्रीचे टार्गेट खते विक्रेत्यांना देतात. ते विकले तर नफा अधिक, असा फंडा या कंपन्यांनी सुरू केला आहे. मग खत विक्रेते युरिया विक्री करताना संबंधित विद्राव्य व सूक्ष्मअन्नद्रव्ये (खते) शेतकऱ्यांना देतात. या प्रकाराला कृषी विभागाने लिकींग म्हणून बंदी केलेली असली तरी हा प्रकार जिल्ह्यात सर्रास सुरू आहे, असे सांगण्यात आले.  दोन खत कंपन्या खतांचा वाहतूक खर्च त्यांना अनुदान म्हणून मिळूनही  आपले होलसेलर, विक्रेत्यांना हा खर्च करायला लावतात. त्यांना आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी पत्र देणार आहे.  - मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com