पीक घेणारी कंपनी तुमची शेती नेते का : नरेंद्र मोदी

तुमच्या जमिनीत कंत्राटी शेतीचा वापर करून तुम्ही आल्याचे पीक घेता, मग ती कंपनी आल्याबरोबर जमीनही बरोबर घेऊन जाते का.
modi
modi

नवी दिल्ली ः तुमच्या जमिनीत कंत्राटी शेतीचा वापर करून तुम्ही आल्याचे पीक घेता, मग ती कंपनी आल्याबरोबर जमीनही बरोबर घेऊन जाते का, असा उपरोधिक सवाल करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायद्यांच्या विरोधात राजकारण करणाऱ्यांना शुक्रवारी (ता. २५) पुन्हा प्रत्युत्तर दिले.   दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ‘पीएम किसान सन्मान’ निधीच्या सातव्या हप्त्याचे ९ कोटींहून जास्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधानांच्या हस्ते शुक्रवारी १८ हजार कोटींचा निधी थेट हस्तांतरित करण्यात आला. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात २-२ हजार रुपये थेट जमा झाले. 

देवाने आम्हालाच सारी बुद्धी दिल्याचा आमचा दावा नाही. कायद्यात काही त्रुटी असतील तर त्या सांगाव्यात. लोकशाहीत चर्चा-संवाद तर हवाच, असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांशी साधलेल्या संवादात मोदींनी दिल्लीतील आंदोलनावरून विरोधकांवर टीकास्त्र सोडले. शेतकऱ्यांना आंदोलनाचा हक्क आहे, पण त्यांच्या नावावर त्यांची दिशाभूल करू नये. फोटो छापून येण्यासाठी सध्या दिल्लीत शेतकऱ्यांना भडकावणाऱ्यांनी वर्षानुवर्षे सत्तेवर राहून छोट्या शेतकऱ्याला बरबाद का व कसे केले? ३०-३० वर्षे बंगालमध्ये राज्य करणाऱ्यांनी त्या राज्याची काय दुर्दशा केली? दिल्लीत येऊन शेतकऱ्यांना भडकावणाऱ्यांनी केरळमध्ये बाजार समिती कायद्यासाठी दारे का बंद केली आहेत? पश्‍चिम बंगालमध्ये राजकीय कारणांसाठी केंद्राच्या कल्याणकारी योजना अडवून दिल्लीत येऊन देशाची अर्थव्यवस्था बरबाद करण्यासाठी कोण उतरले आहे, असे प्रहार करून मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला. 

सत्य ऐकावेच लागेल  शेतकऱ्यांच्या नावावर स्वतःचे झेंडे घेऊन खेळ करणाऱ्यांना, राजकीय मैदानात स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी शेतकऱ्यांच्या रूपात जडीबुटी शोधणाऱ्यांना आता सत्य ऐकावे लागेल. देशात इतकी वर्षे राज्य करून त्यांच्या धोरणांमुळे छोटा शेतकरी सर्वाधिक बरबाद झाला. 

कार्यक्रमात मोदींनी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील औसा येथील गणेश भोसले यांच्यासह विविध राज्यांतील निवडक शेतकऱ्यांशीही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. भाजपचे केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, खासदार व आमदार ठिकठिकाणच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.  पंतप्रधानांचा सवाल  अरुणाचल प्रदेशात आल्याची शेती करण्यासाठी शेकडो शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या गगन पेरिंग या शेतकऱ्याशी बोलताना मोदींनी त्याला, तुमच्या जमिनीतील आल्याचे पीक घेऊन जाणारी कंपनी जमीनही बरोबर नेते का, असे हसत हसत विचारले. त्यावर पेरिंग यांनी, नाही, जमीन कोणी घेऊन जात नाही. असे सांगितल्यावर मोदी म्हणाले, की तुम्ही इतक्‍या दूर अरुणाचल प्रदेशात बसला आहात व तुमची जमीन सुरक्षित आहे, असे सांगत आहात आणि इथे दिल्लीत तेच खोटे पसरवून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे.  पंतप्रधान म्हणाले...

  •   कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना विक्रीचे स्वातंत्र्य 
  •   आंदोलक शेतकऱ्यांना विरोधक खोटे सांगतात 
  •   शेतकऱ्याच्या सुखातच मी माझे सुख पाहतो 
  •   आडमुठेपणामुळे पश्‍चिम बंगालचे शेतकरी मदतीपासून वंचित 
  •   शेतकऱ्यांनी अर्ज करूनही राज्याने व्हेरिफिकेशन रोखले 
  •   स्वार्थी राजकारण करणाऱ्यांना जनता बारकाईने पाहते आहे
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com