नाला खोलीकरणात गेलेे शेत; न्यायासाठी शेतकऱ्याची पायपीट

नाला खोलिकरण
नाला खोलिकरण

अकोला ः उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रणा कुणाचाही मुलाहिजा ठेवत नसल्याची बाब पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. अकोला तालुका कृषी विभागाने अत्यल्प भूधारक शेतकऱ्याला न विचारताच जलयुक्तचे काम त्याच्या शेतात केले. आता हा शेतकरी न्यायासाठी दारोदार भटकत आहे. अकोला तालुक्यातील कापशी रोड येथील देविदास मोतीराम कोकाटे या शेतकऱ्याने याबाबत ठिकठिकाणी तक्रारी केल्या असून, अद्याप मात्र त्यांना दिलासा मिळाला नाही. श्री. कोकाटे यांनी दोन महिन्यांपूर्वी २० फेब्रुवारीला जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देत या प्रकरणाला वाचा फोडली. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले, की कापशी रोड येथे त्यांच्याकडे ०.८० आर म्हणजेच अवघी दोन एकर जमीन आहे. या शेताच्या पश्चिम बाजूला वाघाडी नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरणाचे काम तालुका कृषी कार्यालयाने गेल्या वर्षी सुरू केले होते. या कामामुळे २० गुंठे शेती जाणार असल्याने तेव्हा कोकाटे यांनी नकार दिला होता. त्यामुळे काम अर्धवट राहले होते. मात्र आता काही दिवसांपूर्वी अर्धवट राहलेले हे काम कोकाटे यांना न विचारता रातोरात करण्यात आले. यंत्राने खोदकाम व खोलीकरण करून हे काम पूर्ण करण्यात आले. याबाबत कोकाटे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली, तर त्यांनाच उलट सल्ले देण्यात आल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. शेतामध्ये केलेल्या खोदकामाची पूर्ण चौकशी करून कृषी खात्याने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आपण करणार असल्याचे कोकाटे यानी सांगितले.  

कागदे फिरू लागली या प्रकाराबाबत कोकाटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, कृषिमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच विविध खात्यांच्या प्रमुखांना निवेदन दिले. अद्याप कुठल्याच स्तरावर त्यांना अपेक्षित असलेला न्याय मात्र भेटला नसल्याने ते कागदपत्रांची फाइल घेऊन कार्यालये फिरत असतात. कोकाटे यांनी तक्रार केल्यानंतर तहसिल प्रशासनाने कृषी विभागाला आदेश दिले. त्यानुसार कृषी विभागाने तहसील प्रशासनाला पत्र देऊन सविस्तर घटनाक्रम कळविला. मृद व जलसंधारण विभागानेही २७ मार्चला जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून हे काम या खात्याने केले नसल्याचे स्पष्ट केले. तसेच जिल्हा कृषी विकास अधिकारी कार्यालयानेही हे काम आपल्या कार्यालयाने केले नसल्याचे म्हटले आहे. शासकीय विभाग प्रकरणाबाबत आपापली बाजू कागदोपत्री सादर करीत आहेत. ही सर्व कागदपत्रे आता कोकाटे यांच्या फाइलमध्ये जमा झाली आहेत.  गेलेल्या जमिनीचा मोबदला व न्याय कोण देईल, याचे उत्तर मात्र त्यांना अद्याप मिळालेले नाही.  

रात्री केले खोलीकरण जलयुक्तअंतर्गत हे काम अकोला तालुका कृषी कार्यालयाने केले आहे. शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षी त्यांनी कामाला विरोध केल्याने काम अर्धवट राहले. मात्र या वर्षी आपणास कुठलीही माहिती न देता किंवा परवानगी न घेता संबंधितांनी काम केले. हे काम रात्रीच्या अंधारात पूर्ण केल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. आधीच अत्यल्प जमीन असलेल्या या शेतकऱ्याची जमीन या कामामुळे आणखी कमी झाली आहे. संबंधित विभागाने हे काम रात्रीच्या वेळेत करण्याचा हेतू नेमका काय होता, याचे कोडे उलगडलेले नाही.  आधीच अत्यल्प भूधारक असलेल्या कोकाटे यांची या कामात २० आर जमीन गेल्याने आता पुन्हा त्यांच्याकडील क्षेत्र कमी झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com