पोल्ट्री व्यावसायिकांना नुकसानभरपाई द्या

पोल्ट्री व्यावसायिकांना नुकसानभरपाई द्या
पोल्ट्री व्यावसायिकांना नुकसानभरपाई द्या

अकोला  ः गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोनासारख्या असाध्य रोगाने थैमान मांडले आहे. पोल्ट्रीतील चिकन खाल्ल्यामुळे हा रोग होतो अशा अफवांमुळे पसरल्याने जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसाय डबघाईला आलेला आहे. शासनाने तातडीने या व्यावसायिकांना मदत द्यावी अशी मागणी शुक्रवारी (ता. ६) जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्फत शासनाकडे करण्यात आली.  याबाबत पोल्ट्री व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिले. यात म्हटले की, दिवसेंदिवस या व्यवसायात मंदीमुळे भाव खाली येत असल्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक अत्यंत बिकट परिस्थितीतून जात आहेत. पावसाच्या अनियमिततेमुळे अगोदरच शेती व्यवसाय डबघाईस आलेला आहे. शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकऱ्यांनी पोल्ट्री व्यवसाय सुरू केलेला आहे. ज्यात पोल्ट्री व्यवसायाला लागणारा कच्चा माल आणि कोंबडीच्या पिलांचे भाव यावरच अधिक खर्च होत आहे. खाद्यासाठी वापरला जाणारा मका दोन हजार ते २२०० रुपये प्रतिबॅग मिळत आहे. तर डिओसी ३८०० ते ४००० रुपयापर्यंत मिळते. पोल्ट्री व्यावसायिकास एक किलो चिकन तयार करण्यासाठी ८० ते ९० रुपये खर्च लागत आहे. सध्या बाजारात अवघा ३८ रुपये प्रतिकिलोचा दर आहे. व्यापारी पोल्ट्री व्यावसायिकांची अडवणूक करून दर देत आहेत. आर्थिक अडचणीत सापडलेल्या या व्यावसायिकांवर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. तरी शासनाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शुभम महाले, अक्षय शेगोकर, भारत ठाकरे, विजय आखरे, अनिल पाटील, अमित कांबे, सुधीर माहिसने, सोनल गावंडे आदींनी केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com