पावणेतीन लाख हेक्‍टरवरील पंचनामे पूर्ण

पावणेतीन लाख हेक्‍टरवरील पंचनामे पूर्ण

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील २ लाख ९० हजार  हेक्‍टरवरील कपाशीच्या पिकाचे पंचनामे पूर्ण झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासाठी शासनाने ७ डिसेंबरला दिलेल्या पंचनाम्याच्या आदेशामुळे आधार हवा असलेल्या कापूस उत्पादकांना मदतीची आशा निर्माण झाली आहे.

औरंगाबाद, जालना व बीड या तीनही जिल्ह्यांत यंदा १० लाख ४८ हजार ५३९ हेक्‍टरवर कपाशीची लागवड केली. हे सर्वच्या सर्व क्षेत्र बोंड अळीने बाधित झाले आहे. लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या पाचही जिल्ह्यांतील ४८ तालुक्‍यांत यंदा ५ लाख ४३ हजार ७०५ हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली होती.

यापैकी ४ लाख ७६ हजार ४४ हेक्‍टर क्षेत्र बोंड अळीने मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्याने त्यांचा थेट परिणाम कपाशीच्या उत्पादनावर झाला आहे. नैसर्गिक आपत्तीत कीड हल्ल्याचा समावेश असल्याने व मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश शासनाने ७ डिसेंबरला सर्व विभागीय व जिल्हा प्रशासनाला दिले होते.

नुकसानग्रस्त शेतीचे फोटो मोबाईल ॲपच्या माध्यमातून जीपीएस वर अपलोड करण्याचे स्पष्ट करण्यात आले असून, नुकसान ठरविण्यासाठी पिकाची नोंद सातबारामध्ये असणे आवश्‍यक आहे. शासनाच्या आदेशानुसार तशी माहिती जिल्हा स्तरावरून मागविण्यात आली होती.

प्राप्त माहितीनुसार औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांतील ११ लाख ५५ हजार ११३ शेतकऱ्यांच्या  १० लाख ४८ हजार ५३८ हेक्‍टरवरील कपाशीच्या पिकाचे बोंड अळीमुळे मोठे नुकसान झाले होते. नुकसान झालेले एकूण क्षेत्र व शेतकऱ्यांपैकी १८ डिसेंबरपर्यंत ३ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या २ लाख ९० हजार  हेक्‍टरवरील पंचनाम्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ९८ हजार हेक्‍टर, जालना जिल्ह्यातील ७१ हजार, तर बीड जिल्ह्यातील १ लाख २० हजार हेक्‍टरवरील कपाशीच्या पिकाचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com