`जलयुक्त`ची कामे तातडीने पूर्ण करा : जिल्हाधिकारी

`जलयुक्त`ची कामे तातडीने पूर्ण करा : जिल्हाधिकारी
`जलयुक्त`ची कामे तातडीने पूर्ण करा : जिल्हाधिकारी

अकोला  : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या जलयुक्त शिवार योजनांची कामे वेगाने पूर्ण करावीत. येत्या सात दिवसांत चालू वर्षांतील प्रलंबित असणाऱ्या कामांना प्रशासकीय मंजुरी घेऊन कामाचे आदेश जारी करावेत. या कामांमध्ये दिरंगाई करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात कृषी विभागाशी संबंधित विविध विषयांवर बैठक झाली. अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अशोक अमानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, सहकार उपनिबंधक गोपाळ मावळे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) विजय शेगोकार आदी उपस्थित होते.

रब्बी हंगामासाठी पंतप्रधान पीकविमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. शेतकरी, जिनिंग प्रेसिंगचालक, कॉटन ऑईल कंपन्यांनी आतापासूनच बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असेही आवाहन त्यांनी केले. या वेळी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देण्यासाठी प्राप्त सात प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.

प्रारंभी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणाचा (आत्मा) आढावा घेण्यात आला. या वेळी आत्मा नियामक मंडळाच्या ४ सप्टेंबरच्या सभेच्या इतिवृत्ताला मान्यता मिळाली. आत्मा कॅफेटएरियाअंतर्गत वैयक्तिक शेतकरी व शेतकरी गटांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनपर बक्षिसासाठी सर्व तालुक्यांनी लक्ष्यांकानुसार येत्या दहा दिवसांत प्रस्ताव सादर करण्याची सूचना देण्यात आली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ॲग्रोटेक प्रदर्शनासोबतच आत्माअंतर्गत जिल्हा कृषी प्रदर्शनाच्या आयोजनाला मान्यता मिळाली. हे प्रदर्शन २७ ते ३१ डिसेंबर रोजी करण्याचे नियोजित आहे.

या प्रस्तावांना मान्यता...

अकोला तालुक्यातील आगर येथील वऱ्हाड ग्रेन्स ॲग्रो प्रोडुसर कंपनी, कापशी तलाव येथील स्वयंभु गणेश शेतकरी उत्पादक गट, निंभोरा येथील कृषी समृद्धी शेती उत्पादक गट, हिंगणी बु. येथील संत गाडगेबाबा शेतकरी उत्पादक गट, अकोट तालुक्यातील धनकवाडी येथील श्री स्वामी समर्थ शेतकरी बचतगट, पातूर तालुक्यातील चरणगाव येथील श्रमिक भारती ॲग्रो प्रोडुसर लि. आणि बार्शिटाकळी तालुक्यातील सुकळी येथील श्री हरी कृषी विज्ञान मंडळाच्या अध्यक्षांनी सादरीकरण केले. या सात प्रस्तावांना या वेळी तत्वत: मान्यता देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com