पुणे जिल्ह्यात संमिश्र निकाल; दावे-प्रतिदावे

जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतींचे निकाल संमिश्र लागले आहेत. अनेक ठिकाणी स्थानिक आघाड्याकरुन निवडणुका लढविण्यात आल्या असल्यामुळे प्रमुख पक्षांनी वर्चस्वाचा दावा केला आहे.
Composite results in Pune district; Claims-counter-claims
Composite results in Pune district; Claims-counter-claims

पुणे ः जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतींचे निकाल संमिश्र लागले आहेत. अनेक ठिकाणी स्थानिक आघाड्याकरुन निवडणुका लढविण्यात आल्या असल्यामुळे प्रमुख पक्षांनी वर्चस्वाचा दावा केला आहे. निकालांमध्ये अनेकांनी आपापल्या जागा राखल्या असल्या तरी ओतूर (ता. जुन्नर) ग्रामपंचायतीवरील अनेक वर्षांची शिवसेनेची सत्ता संपुष्टात येऊन, राष्ट्रवादीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

मंचर ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने एकत्र लढली असली तरी या ठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व कायम आहे. निमगावकेतकी (ता. इंदापूर) येथे हर्षवर्धन पाटील यांना धक्का बसला आहे. तर यवत (ता. दौड) येथे थोरात गटाने सत्ता कायम राखली आहे. बारामतीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने वर्चस्व कायम ठेवले असून, भाजपाला सपाटून मार खावा लागला आहे.

जुन्नरमध्ये दावे, प्रतिदावे जुन्नर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल पक्षीय दृष्टिकोनातून संमिश्र असल्याचे चित्र आहे. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे दोन प्रबळ राजकीय पक्ष असल्याने दोघांनी या निवडणुकीत आपले वर्चस्व असल्याचा दावा केला आहे. जुन्नरला ६५ ग्रामपंचायतीपैकी धामणखेल अहिनवेवाडी, ठिकेकरवाडी, नेतवड, धालेवाडी तर्फे हवेली, मांदारणे या सहा ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. एकूण ६२१ जागांपैकी २१० जागा बिनविरोध झाल्या. तर १० जागा उमेदवारी अर्ज न आल्याने रिक्त राहिल्याने ५९ ग्रामपंचायतींच्या १७८ प्रभागांतील ४०३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ९४५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. दरम्यान सर्वात मोठ्या ओतूर ग्रामपंचायतीवरील शिवसेनेचे वर्चस्व संपुष्टात आले असून, राष्ट्रवादी कॉँग्रेसला १७ पैकी ११ जागा. शिवसेनेचे माजी सरपंच बाळासाहेब घुले पराभूत झाले असून, राष्ट्रवादीचे उमेदवार व गजानन महाराज शिक्षण संस्थेचे सचिव वैभव तांबे हे बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे यांच्याकडून पराभूत झाले आहेत.

खेडवर राष्ट्रवादीचा दावा खेड तालुक्यात ९१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सुमारे ८८ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व असल्याचा तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर यांनी केला आहे. तालुक्यात आमदार दिलीप मोहीते यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका झाल्या. त्यात तालुक्यातील जनतेने आमदार मोहीते यांच्या सत्तेला साथ दिली आहे.  

बारामतीत ‘राष्ट्रवादी पुन्हा’ बारामती तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींसाठी आज सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली. पहिल्या तीन टप्प्यांत प्रत्येकी पंधरा तर शेवटच्या टप्प्यात चार ग्रामपंचायतींची मतमोजणी करण्यात आली. बारामती तालुक्यात अपेक्षेनुसार राष्ट्रवादीचेच निर्विवाद वर्चस्व असून पक्षाच्या दोन पॅनेलमध्ये निवडणूक झालेली असल्याने राष्ट्रवादीचे वर्चस्व यंदाही कायम दिसले.

चंद्रराव तावरे यांना धक्का सांगवीमध्ये चंद्रराव तावरे यांनी ताकद लावली होती, मात्र तेथेही राष्ट्रवादीच्या दहा उमेदवारांचा; तर तावरे यांच्या पाच उमेदवारांचा विजय झाला. माळेगाव कारखान्यापाठोपाठ सांगवी गावातही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. अनिल तावरे, प्रकाश तावरे, महेश तावरे, किरण तावरे यांनी संयुक्त प्रयत्न करीत सांगवी येथे राष्ट्रवादीकडे सत्ता खेचून आणली. ही निवडणूक तालुक्यात प्रतिष्ठेची होती.

यवतवर थोरात गटाचे वर्चस्व दौंड तालुक्यात सर्वाधिक राजकीय चुरस असलेल्या यवत ग्रामपंचायतीवर थोरात गटाने हॅटट्रिक साधली आहे. माजी आमदार रमेश थोरात व विद्यमान आमदार राहुल कुल या दोन्ही नेत्यांचे गट यवतमध्ये तुल्यबळ आहेत. २०१० साली मात्र थोरात गटाने मुसंडी मारत ११ विरुद्ध ६ असे घवघवीत यश मिळवत ग्रामपंचायत ताब्यात घेतली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या कुल गटाने निकराचे प्रयत्न सुरू केले. मात्र त्यांना अद्याप यश मिळवता आले नाही. मागील वेळी ९ विरुद्ध ८ अशा निसटत्या बहुमतावर थोरात गटाने ग्रामपंचायत ताब्यात ठेवली. या वर्षी त्यात बदल करण्यास यश आले नाही.

निमगाव केतकीवर राष्ट्रवादीचा झेंडा इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी ग्रामपंचायतीवर सलग दहा वर्षे भाजपच्या जाधव गटाची असलेली सत्ता उलथून टाकत राष्ट्रवादीने दशरथ डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली एक हाती सत्ता घेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकविला.

मंचर ग्रामपंचायत महाविकास आघाडीकडे आंबेगाव तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या मंचर ग्रामपंचायतीच्या आठ जागांसाठी निवडणूक रिंगणात एकूण २१ उमेदवार उभे होते. महाविकास आघाडीचे सात व एक अपक्ष उमेदवार विजयी झाला. १७ जागांपैकी आघाडीच्या नऊ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यामध्ये सात जागा शिवसेनेच्या व दोन जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस जागांचा समावेश होता. निवडणुकीत निवडून आलेल्यांमध्ये महाविकास आघाडीत शिवसेनेच्या दोन, राष्ट्रवादी कॉंग्रेस दोन व माजी खासदार (स्व) किसनराव बाणखेले कॉंग्रेस गटाच्या तीन जागा निवडून आल्या आहेत. एक अपक्ष विजयी झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com