मुक्त विद्यापीठातर्फे भविष्यातील संधींच्या शिक्षणक्रमांची रचना ः कुलगुरू प्रा. राव

मुक्त विद्यापीठातर्फे भविष्यातील संधींच्या शिक्षणक्रमांची रचना ः कुलगुरू प्रा. राव
मुक्त विद्यापीठातर्फे भविष्यातील संधींच्या शिक्षणक्रमांची रचना ः कुलगुरू प्रा. राव

नाशिक :  महाराष्ट्राच्या शैक्षणिक विकासामध्ये महात्मा फुले, डॉ. पंजाबराव देशमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, स्वामी रामानंदतीर्थ यांच्यासारख्या विचारवंत आणि सुधारकांचे मोठे योगदान लाभलेले आहे. त्यामुळे या राज्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना ही त्या योगदान -परंपरेचाच एक भाग म्हणता येईल. जगण्याला पूरक तसेच भविष्यातील व्यावसायिक संधींचा विकास करणाऱ्या शिक्षणक्रमांची रचना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ करीत आहे,  असे प्रतिपादन इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. नागेश्वर राव यांनी येथे केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या रौप्यमहोत्सवी २५ व्या दीक्षान्त समारंभप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन होते. 

प्रा. राव म्हणाले, की गेल्या काही वर्षांमध्ये मुक्त विद्यापीठांच्या कार्यपद्धतीवर नियामक संस्थांचे नियंत्रण मोठ्या प्रमाणावर वाढल्याने मुक्त विद्यापीठांना कामकाजविषयक मर्यादा येत आहेत. अशा परिस्थितीत या प्रणालीतून शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची जबाबदारी अधिक वाढते. दूरशिक्षण प्रणालीद्वारे शिक्षण पूर्ण करणाऱ्या व्यक्तींच्या व्यावसायिक कौशल्यामध्ये वाढ होते. त्या दृष्टीने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवास सुरू ठेवण्याची संधी दिली असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. विद्यापीठाची पदवी मिळविल्यानंतर देखील विद्यार्थ्यांनी सतत नवनवीन व अद्ययावत ज्ञान मिळवत कष्टांसह नीतिमूल्ये सांभाळून प्रगती करावी, असे आवाहन केले.  

कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी सांगितले, की विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शैक्षणिक व प्रशासकीय सेवा प्राप्त करून देणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी अभ्यासकेंद्राचे पुनर्परीक्षण व त्यांचे सक्षमीकरण प्रक्रिया विद्यापीठाने हाती घेतले आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने पदव्युत्तर शिक्षणक्रमांचे अध्ययन साहित्य यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठास वापरण्याची परवानगी देऊन सहकार्याचे एक नवीन दालन उघडले आहे. अशा संस्थांतर्गत सहकार्यामुळे शिक्षणक्रमाची गुणवत्ता उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी व्यक्त केला. गेल्या वर्षभरातील विद्यापीठाचा कामकाजाचा व प्रगतीचा आढावा सादर केला. 

या वेळी १ लाख ४८ हजार २६० विद्यार्थ्यांना पदवी जाहीर करण्यात आली. दीक्षान्त समारंभात विविध ४२ पदविका, ३ पदव्युत्तर पदविका,  ५१ पदवी,  ३१ पदव्युत्तर पदव्या,  ३ विद्यानिष्णात व एक विद्यावाचस्पतीची पदवी प्रदान करण्यात आली. कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी दीक्षान्त समारंभात दिलेल्या पदविका आणि पदवी यांची शिक्षणक्रमनिहाय यादी वाचून दाखवली. कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी उपस्थित स्नातकांना उपदेश केला. प्रमुख अतिथीच्या हस्ते विद्याशाखानिहाय विद्यार्थ्यांना सुवर्णपदके आणि पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com