चारा छावण्यांची मुदत संपल्याने चिंता वाढली

चारा छावण्यांची मुदत संपल्याने चिंता वाढली
चारा छावण्यांची मुदत संपल्याने चिंता वाढली

नगर ः यंदाच्या उन्हाळ्यात दुष्काळी भागात जनावरे जगविण्यासाठी जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. पाऊस पडल्यावर त्या बंद होतील अशी आशा होती. मात्र, जोरदार पाऊस झाला नसल्याने चारा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे अजूनही कर्जत तालुक्यात २८ छावण्या सुरू असून तेथे सतरा हजार जनावरे जगविली जात आहे. छावण्या सुरू ठेवण्याची मुदत सोमवारी (ता. ३०) संपली आहे. त्यामुळे छावण्या सुरू ठेवण्याला मुदतवाढ मिळतेय का? याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. छावण्या बंद झाल्या तर जनावरे जगविण्याची चिंता कायम आहे.

पावसाळ्याचे साधारण तीन महिने उलटत आहेत. पावसाळ्यातील महत्त्वाचे आणि हमखास बरसणारे रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्‍लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा ही पावसाची नऊ नक्षत्रे सरली आहेत. अजूनही अनेक भागांत जोराचा पाऊस नाही. विशेषतः जिल्ह्याच्या दक्षिण भागात पाणी साठवण झालेली नसल्याने पाण्याची आणि चाऱ्याची चिंता मिटलेली नाही. उत्तरा नक्षत्रात पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. मात्र, अद्यापही कर्जत तालुक्‍यात २८ चाराछावण्या सुरू आहेत. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या २४५ टॅंकरची वारी भर पावसाळ्यात सुरूच आहे. शुक्रवारी (ता. २७) हस्त नक्षत्र सुरू झाले. 

आतापर्यंत झालेल्या पावसाने उत्तरेतील मुळा, भंडारदरा तुडुंब भरले. भीमा, प्रवरा, मुळा, गोदावरी नद्या दुथडी भरून वाहिल्या आहेत. मात्र, जिल्ह्याचा काही शिवार कोरडाच आहे. गेल्यावर्षी पाऊस झाला नसल्याने यंदा दुष्काळात जनावरे जगविण्याची चिंता कायम होती. त्यामुळे टंचाईच्या स्थितीत फेब्रुवारीपासून गेल्या पाच महिन्यांत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ५११ छावण्यांना मंजुरी दिली. यांपैकी ५०४ चाराछावण्यात तीन लाख ३६ हजार २०३ जनावरे होती. आजमितीला पावसामुळे छावण्यांचा जोर ओसरला असला, तरी कर्जत तालुक्‍यात २८ छावण्या सुरूच आहेत. त्यांत १६ हजार ९०३ जनावरे जगवली जात आहेत. पिण्याच्या पाण्याचीही चिंता कायम आहे.

दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी छावण्या सुरू झाल्या. पुढे ज्या भागात टंचाई आहे, पाऊस झालेला नाही त्या ठिकाणी गरजेनुसार त्या सुरू ठेवल्या. सप्टेंबरअखेरपर्यंत छावण्या सुरू ठेवण्याचे आदेश होते. आता शासनाच्या पुढील आदेशानुसार कारवाई होईल. - प्रशांत पाटील,  निवासी उपजिल्हाधिकारी, नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com