परिषदेमुळे भारतातील घुबडांच्या संवर्धनास मदत :डॉ. डंकन

Conference helps conservation of owls in India: Dr. Duncan
Conference helps conservation of owls in India: Dr. Duncan

पुणे : ‘‘भारतात घुबडांबाबत असलेली अंधश्रद्धा, कीटकनाशकांचा अमाप वापर आणि वस्तिस्थाने नष्ट होण्याचा धोका आहे. आंतरराष्ट्रीय परिषदेमुळे सर्वसामान्य नागरीकांसह शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होऊन, घुबडांच्या संरक्षण आणि संवर्धनाबरोबरच घुबडांची संख्या टिकवून ठेवण्यास मदत होईल’’, असे प्रतिपादन ‘जागतिक घुबड परिषदे’चे समन्वयक डॉ. जेम्स डंकन यांनी केले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. नितीन करमळकर, वन विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर, इस्रायलमधील प्रख्यात पक्षितज्ञ डॉ. रुवेन योसेफ, प्राणिशास्त्र विभागाच्या डॉ. कल्पना पै, ‘इला फाउंडेशन’चे संचालक डॉ. सतीश पांडे हेही या वेळी उपस्थित होते. 

डॉ. काकोडकर म्हणाले, ‘‘महाराष्ट्राच्या पर्यावरणपूरक पर्यटनामध्ये घुबड या पक्ष्याला महत्व प्राप्त व्हायला हवे. त्यादृष्टीने वन विभागाकडून दुर्लक्षित घुबडांचा अभ्यास केला जाईल. असे कार्यक्रम विद्यापीठात होण्याला विशेष महत्व आहे.’’ 

डॉ. करमळकर म्हणाले, ‘‘भारतीय संस्कृतीत माणसाला निसर्गाचा मालक नव्हे, तर हा त्याचा एक भाग मानले जाते. त्यामुळे निसर्ग-पर्यावरणाच्या संवर्धनाचे काम होणे आवश्यक आहे. आताच्या परिषदेत विद्यापीठ, सेवाभावी संस्था, वन विभाग, अभ्यासक असे सर्व जण सहभागी झाले, हे अतिशय महत्वाचे आहे. त्यातून घुबडांचे आणि एकूणच पर्यावरणाचे संवर्धन व्हायला मदत होईल.’’ 

पक्षितज्ज्ञ रूवेन योसेफ यांनी, भारतातील पर्यावरणाच्या अभ्यासात आपला सहभाग असल्याचे सांगून त्यात आणखी वाढ केली जाईल, असे सांगितले. 

परिषदेच्या पहिल्या दिवशी अनेक अभ्यासकांनी त्यांचे संशोधन सादर केले. भारत आणि अन्य देशातील संस्कृतीमधील घुबड विषयक संकल्पना या सत्रात ‘भारतीय संस्कृतीतील घुबड’ या विषयावर डॉ. सुरुची पांडे यांनी विचार मांडले. तसेच, ऑस्ट्रियामधील संशोधक इनग्रीड कोल, स्वीत्झरलँड मधील संशोधक अॅलेक्स राऊलींन यांनी विचार व्यक्त केले. परिषदेला १६ देशांमधील घुबड अभ्यासक सहभागी झाले आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com