प्रेरणादायी अनुभवाबरोबरच मिळाला आत्मविश्वास : सरपंचांच्या भावना

प्रेरणादायी अनुभवाबरोबरच मिळाला आत्मविश्वास
प्रेरणादायी अनुभवाबरोबरच मिळाला आत्मविश्वास

आळंदी, जि. पुणे : येथे आयोजित आठव्या सरपंच महापरिषदेत विविध तज्ज्ञ, अभ्यासू वक्त्यांच्या मार्गदर्शनातून आम्हाला ज्ञान मिळालेच. पण कृतिशील, धडपडणाऱ्या सरपंचांच्या अनुभवातून प्रेरणाही मिळाली. एकूणच या महापरिषेदतून आमच्यातील आत्मविश्वास जागृत झाल्याची भावना सरपंचांनी आपल्या प्रतिक्रिया देताना व्यक्त केली.

सरपंचांचा अधिकार समजला महापरिषदेतून बरीच माहिती मिळाली. विविध योजना समजल्या. माझे गाव आदिवासी बहुल आहे. आदिवासींसाठी शासकीय योजना कमीच आहेत. त्या आणखी राबविण्याची गरज आहे. सरपंचाच्या अधिकाराचीही माहिती मिळाली.   - सौ. अलका सावळकर, सरपंच, निमधरी,ता. अचलपूर, जि. अमरावती.

महापरिषद ठरली संस्मरणीय महापरिषद ग्रामविकासाचा जागर करणारी ठरली. ही महापरिषद सदैव स्मरणात राहील. कारण मला जी माहिती मिळाली, जे सरपंच भेटले, ते सर्व प्रेरणादायी, उपयुक्त असेच आहेत. एकाच ठिकाणी दोन दिवस माहितीचा खजिना मिळाला. एकूणच अनुभव चांगला होता. - जगदेव खुमान पाटील, सरपंच, वैंदाणे, जि. नंदुरबार.

सरपंचांचे अधिकार वाढवा महापरिषदेचा हा उपक्रम स्तुत्य असा आहे, आमच्यासारख्या सरपंचांना अशा संवादाची, ज्ञानाची गरज होती. नवे अनुभव, विचारांची देवाण-घेवाण झाली. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या सरपंचांशी बोलता आले. त्यांच्या भागातील उपक्रम, कामे जाणून घेता आली. सरपंचांना सध्याच्या अधिकाराच्या तुलनेत आणखी अधिकार वाढविण्याची गरज आहे.   - गोविंद कदम, सरपंच, धानोरी, जि. लातूर.

मार्गदर्शनातून प्रेरणादायी अनुभव ग्रामविकासाच्या कामात आम्हाला हातभार लावण्यासाठी महापरिषद उपयुक्त ठरली. तज्ज्ञांची चर्चासत्रे, शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबतचे नेमके ज्ञान मिळाले. काही सरपंचांच्या मार्गदर्शनातून प्रेरणादायी अनुभव मिळालाच, पण महापरिषदेतून आमचा आत्मविश्वास वाढला,   -  सतीश गावित, सरपंच, नटावद, जि. नंदूरबार.

गावाच्या विकासासाठी मिळाली उपयुक्त माहिती गावाने पाणीप्रश्नावर काम करण्याची गरज आहे. मी स्वतः माझ्या गावात काम केले आहे. पाणी व्यवस्थापन, स्वच्छता अभियान यांसारख्या विषयांवर काम व्हायला हवे. या महापरिषदेतून आम्हाला बरेच काही मिळाले. या ज्ञानाचा, माहितीचा उपयोग आम्ही आमच्या गावाच्या विकासासाठी करू. -  सौ. वर्षा निकम,  सरपंच, मानदापूर, ता. कळंब, जि. यवतमाळ.

ग्रामविकासाला मिळतेय चालना गावकारभार करताना महिलांना माहितीचा अभाव असतो. सरपंच महापरिषदेतून माहिती मिळत असल्याने महिला सरपंचांना याबाबत आधार मिळत आहे. या परिषदेतून बरीच माहिती मिळाली. राज्यभरातील विविध सरपंचांनी केलेल्या कामाची माहिती मिळाली. अशी संधी मिळणे खरंच महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागाच्या विकासाला या परिषदेमुळे चालना मिळत आहे. - सुनीता संदीप मारकड,  सरपंच, ता. करमाळा, जि, सोलापूर.

कामांसाठी अनुभव ठरतात फायदेशीर सरपंचांवर ग्रामविकासाची खऱ्या अर्थाने जबाबदारी आहे. मात्र अनेक बाबी माहिती नसतात. सरपंच महापरिषदेतून अनेक अनुभव जवळून अनुभवता आले. आपापल्या भागात काम करताना त्याचा फायदा होतो. येथे राज्यभरातून निवडक सरपंच येतात. खरं म्हणजे परिषदेसाठी निवड होते, म्हणजे आपले काम चांगले आहे, यावर खात्री होते. - विजय शेंडे, सरपंच, शेडगाव, ता. श्रीगोंदा, जि. नगर.   महापरिषदेतून बरेच शिकता आले सरपंच एकत्र आणून त्यांना माहिती देणे, समन्वय घडवणे हा खरे तर महत्त्वाचा उपक्रम आहे. ‘अॅग्रोवन’च्या सरपंच महापरिषदेची सरपंच वाट पाहतात. येथे ज्ञानात भर पडते, ग्रामविकासासाठी आणि महाराष्ट्र घडविण्यासाठी या बाबी महत्त्वाच्या ठरत आहेत. दोन दिवसांच्या परिषदेतून बरेच शिकता आले. - सचिन कदम, सरपंच, कुंदे, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.

गावात कामे करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले सरपंच पदावर आल्यानंतर अनेक दिवस काय करावे हेच कळत नाही. काम करण्याची इच्छा असूनही काम करण्याला अडचणी येतात. मात्र महापरिषद सरपंचांसाठी महत्त्वाची ठरत आहे. राज्यभरातील सरपंचांनी केलेल्या कामाची माहिती तर मिळते, शिवाय गावात काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. ग्रामविकासासाठी काम करणाऱ्या लोकांचे अनुभव कामी येतात.  - कविता भांगरे, सरपंच, टिटवी, ता. अकोले, जि. नगर.

दुष्काळी भागातील सरपंचांसाठी परिषद महत्त्वाची दुष्काळी भागात सरपंचांची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र अनेक बाबी माहिती नसल्याने, अनुभव नसल्याने सरपंंचांना अडचणी येतात. सरपंच महापरिषदेमुळे बराच फायदा होणार आहे. दुष्काळी भागातील सरपंचांसाठीही महापरिषद महत्त्वाची आहे. येथील अनुभव गाव विकासाला चालना देणारी आहे. परिषदेतील वक्त्याची भाषणे आदर्श आहेत. -  अभिमान जरांगे, सरपंच, मातोरी, ता. शिरूर कासार, जि. बीड.

महिला सरपंचांसाठी माहिती ठरेल उपयुक्त आदिवासी भागांतील सरपंचांना फारशी माहिती मिळत नाही. प्रशासकीय पातळीवरही फारशी माहिती दिली जात नाही. मात्र ‘अॅग्रोवन’च्या सरपंच महापरिषदेत अामच्यासारख्या महिला सरपंचांना संधी मिळाली याचा खूप आनंद झाला. येथे मिळालेल्या माहिती आणि अनुभवाचा काम करताना निश्चित फायदा होईल. - शांता पोपरे, सरपंच, कोंभाळणे, ता. अकोले, जि. नगर

वनशेती, भातशेतीबाबत काम करणार सरपंच महापरिषदेतून ग्रामविकास, शिक्षण, महिलांचा विकास यासंबंधीची माहिती मिळाली. ही महापरिषद ग्रामविकासाला चालना देणारी आहे. मी महिलांना प्रशिक्षण देऊन बचत गटाच्या माध्यमातून लहान उद्योग सुरू केला आहे. पण यापुढे आमच्या गावातील वनशेती व भातशेतीसंबंधी काम करू. - साक्षी भिंगार्डे, सरपंच, आंबा, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर   अनेक नवीन विषय समजले सकाळ माध्यम समूहाने सरपंच महापरिषदेच्या माध्यमातून हाती घेतलेला ग्रामविकासाचा विषय अतिशय सुंदर आहे. दोन दिवस शासकीय योजना, विविध गावांमधील कामे याची चांगली माहिती मिळाली. या माहितीचा उपयोग मी माझ्या गावात कामांसाठी करून घेईल. मला अनेक नवे विषय मिळाले. - अमोल पाटील, सरपंच, मंदूळकोळे, ता. पाटण, जि. सातारा.

उत्तम कामे करणारे सरपंच भेटले ग्रामविकास साधायची ताकद या महापरिषदेतून मिळाली. उत्तम कामे करणारे सरपंच भेटले. त्यांनी आपल्या गावात कामे कशी केली, याची माहिती मिळाली. त्यांच्याकडून घेतलेली माहिती, गावातील उपक्रम, योजना राबविण्यास लाभदायी आहे. - प्रकाश जाधव,  सरपंच, कांजळे, ता. भोर, जि. पुणे.

मार्गदर्शन ठरेल गावासाठी फायदेशीर माझ्याकडे ३० एकर शेती आहे. शेतीसाठी मार्गदर्शन मिळते. आता मी सरपंच झालो आहे. गावात कामे कशी करून घ्यायची याचे मार्गदर्शन मला महापरिषदेतून मिळाले.  दोन दिवस राज्यातील आघाडीच्या वक्त्यांचे मार्गदर्शन मिळाले. त्याचा चांगला फायदा मला व माझ्या गावाला होईल. - प्रमोद शंकर गव्हाळे, सरपंच, खापरी, ता. शेलू, जि. वर्धा.

राज्यातील सरपंचांशी संवाद साधता आला गावाचा प्रतिनिधी म्हणून सरपंच महापरिषदेत सहभागी झालो. त्यामुळे गावाच्या विकासासाठी आवश्यक माहिती येथून नेण्याचा प्रयत्न आहे. राज्यभरातील सरपंचांशी संवाद साधता आला. गावात कोणत्या सुधारणा करता येतील, याची माहिती मिळाली. विविध योजना राबविताना याचा फायदा होणार आहे. - प्रभाकर कांबळे, सरपंच, खिर्डी, ता. श्रीरामपूर, जि. नगर.

नवा दृष्टिकोन मिळाला सरपंचांना माहिती नसलेल्या अनेक योजना या ठिकाणी समजल्या. वक्त्यांच्या मार्गदर्शनातून नवा दृष्टीकोन मिळाला. गावाचा विकास करताना त्याचा निश्‍चितच फायदा होणार आहे. - मोहन क्षीरसागर, सरपंच, धानोरे, ता. माढा, जि. सोलापूर.

महिला सरपंचांसाठी मोठे व्यासपीठ पुरुष मंडळी बाहेरगावी जात असल्याने त्यांना विविध माहिती मिळत असते. तसे सर्वच महिलांना शक्य होत नाही. यानिमित्ताने महिलांना कौटुंबिक दडपणातून बाहेर पडून शिकता आले. विविध योजनांविषयी भरपूर माहिती एकच ठिकाणी मिळत असल्याने महिला सरपंचांसाठी हे मोठे व्यासापीठ आहे.   - सौ. शोभा गुंड, सरपंच, पाकणी,ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर.

शासकीय योजनांबाबत मिळाले प्रशिक्षण महापरिषेदच्या माध्यमातून  खेडेगावातील अनेक महिला सरपंचांचा प्रथमच शासकीय योजनांबाबत प्रशिक्षण मिळाले. शिवाय त्यांना बोलण्याची मत मांडण्याची संधी मिळाल्याने धाडस वाढणार अाहे. - राजश्री पाटील, सरपंच, नंद्याळ, जि. कोल्हापूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com