पीकनुकसान नोंदीची खातरजमा करा Confirm the crop loss record
पीकनुकसान नोंदीची खातरजमा करा Confirm the crop loss record

पीकनुकसान नोंदीची खातरजमा करा

राज्यात सतत सुरू असलेल्या अवकाळी पावसाने पिकाचे नुकसान होते आहे. मात्र शेतातील पंचनाम्यांमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद योग्य पद्धतीने होते की नाही, याची खातरजमा स्वतः कृषी सहायकांनी करावी, असे आदेश आयुक्तालयाने दिले आहेत.

पुणे : राज्यात सतत सुरू असलेल्या अवकाळी पावसाने पिकाचे नुकसान होते आहे. मात्र शेतातील पंचनाम्यांमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद योग्य पद्धतीने होते की नाही, याची खातरजमा स्वतः कृषी सहायकांनी करावी, असे आदेश आयुक्तालयाने दिले आहेत.   अतिवृष्टीमुळे यंदा राज्याच्या खरीप पिकांवर अभूतपूर्व संकट कोसळले आहे. त्यामुळे कृषी सचिव एकनाथ डवले व आयुक्त धीरज कुमार सध्या पीकविमा भरपाई व नैसर्गिक आपत्ती प्रतिसाद मदत अशा दोन्ही कामकाजांशी संबंधित घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.  ‘‘पीकविम्याची कामे मार्गी लागावी व दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात काही रक्कम जमा व्हावी, असा प्रयत्न सचिवांचा आहे. तर नैसर्गिक आपत्तीमधून मदत मिळण्याकरिता प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या नोंद काळजीपूर्वक होऊन व्हावी, असा आयुक्तांचा प्रयत्न आहे. आम्हाला महसूल विभागाची खात्री देता येणार नाही. मात्र मंत्रालय ते क्षेत्रीय पातळीवर कृषी विभागाची कामे गांभीर्याने चालू आहेत,’’ अशी माहिती एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.  राज्यातील सर्व कृषी सहसंचालकांना आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे गांभीर्याने पूर्ण करण्याविषयी आयुक्तांनी सूचित केले आहे. ‘‘पंचनाम्यात एकूण विमा संरक्षित क्षेत्र, नुकसान झालेले क्षेत्र तसेच नुकसानीचे प्रमाण या तीन महत्त्वाच्या आकड्यांची योग्य नोंद होती की नाही, याची खातरजमा कृषी सहायकांनी करावी,’’ असे आयुक्तांनी म्हटले आहे. विमा कंपन्या या नोंदीबाबत काहीही आक्षेप घेतात. त्यातून शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही. त्यामुळे कृषी सहायकांना दक्षता घेण्याचे सूचित करण्यात आले आहे. ‘‘विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत काही वेळा विसंवाद होतो. या स्थितीत कृषी सहायकाने स्वतः पंचनाम्यावर नुकसानीचे क्षेत्रफळ व नुकसानीचे प्रमाण या बाबत आपलेही स्पष्ट मत नोंदवावे,’’ असेही आयुक्तांनी सुचविले आहे. ‘‘शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत विमा कंपनीला पूर्वसूचना देण्याविषयी कोणी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तालुकास्तरावर विमा कंपनीकडून बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती संबंधित घ्यावी. या आकडेवारीचा पंचनाम्याशी ताळमेळ बसतो की नाही, याचाही आढावा घ्यावा,’’ अशी सूचनाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली आहे.  कृषी सहायकांना देण्यात आलेल्या सूचना   स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत झालेल्या नुकसानीचे योग्य पंचनामे करा   ही कामे विमा कंपनीच्या प्रतिनिधीसोबत तातडीने संयुक्तपणे करा   पंचनाम्यावरून विमा कंपनीशी वाद झाल्यास स्वतःचे मत स्पष्टपणे नोंदवा   असे मत नोंदविले असल्यास त्याची एक प्रत स्वतःकडे ठेवा  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com