नियमित पीककर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांत संभ्रम

Confusion among farmers who pay regular crop loans
Confusion among farmers who pay regular crop loans

सातारा : वेळेत परतफेड करणाऱ्यांना शासनाने ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान जाहीर केले. तर त्यापेक्षा जास्त दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्यांनाही कर्ज परतफेड केल्यावर पैसे खात्यावर जमा करणार असल्याचे म्हटले आहे. पण प्रत्यक्षात याबाबतचा शासन निर्णय अद्याप आलेला नसल्याने नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांत संभ्रमाचे वातावरण आहे.  

थकबाकीदारांच्या कर्जमाफीनंतर आता सर्वांत महत्त्वाचा टप्पा म्हणजे वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा आहे. जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख शेतकरी हे पीककर्ज नियमित परतफेड करतात. काही शेतकऱ्यांसाठी पीककर्ज परतफेड करण्याची मुदत ३१ मार्च तर काहींची ३० जून आहे. त्याप्रमाणे गेल्या वर्षी घेतलेले पीककर्ज आता या तारखांच्या आत शेतकऱ्यांनी भरायचे आहे. अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर एप्रिलमध्ये प्रोत्साहन अनुदानाची ५० हजार रुपयांची रक्कम जमा केली जाणार आहे. 

तसेच ५० हजारांपेक्षा कमी कर्ज असलेल्यांना त्यांची कर्ज आणि व्याजाची रक्कम या अनुदानातून परत मिळेल. पण ५० हजारांपेक्षा जास्त दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलेल्या मुदतीत परतफेड करावी लागणार आहे. त्यानंतर त्यांना प्रोत्साहित केलेली रक्कम दिली जाणार आहे. सध्यातरी शासनाकडून याबाबतचा शासन निर्णय सहकार विभागाला मिळालेला नाही. आगामी आठवड्यात हा निर्णय येण्याची शक्‍यता आहे. त्यानंतरच नेमके नियम आणि अटी समजणार आहेत. शासनाने मुख्यमंत्र्यांच्या छायाचित्रासह दिलेल्या जाहिरातीत नमूद केलेल्या माहितीनुसार सहकार विभाग नियमित परतफेड करणाऱ्यांबाबत भूमिका मांडत आहे. प्रत्यक्ष शासन निर्णय आणि शासनाच्या जाहिरातीतील मुद्दे यामध्ये तफावत राहणार आहे. 

परिणामी, शेतकऱ्यांनी २०१९-२० मध्ये घेतलेले कर्ज वेळेतपरतफेड केल्यास सदर शेतकरी थकबाकीदार होणार नाही. तरीही काही शेतकऱ्यांनी आमच्या कर्जातून प्रोत्साहन अनुदान वजा करून उर्वरित रक्कम भरून घ्या, अशी भूमिका घेतल्याने सोसायटीच्या सचिवांची डोकेदुखी वाढली आहे. तर बहुतांशी सोसायट्यांनी ३१ मार्चपर्यंत वसुली पूर्ण करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे नियमित परतफेड करणाऱ्यांत संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.

वेळेत परतफेड करणाऱ्यांसाठी अधिवेशनात जाहीर झाल्याप्रमाणे प्रत्यक्षात शासन निर्णय आलेला नाही. शासन निर्णय आल्याशिवाय सहकार विभाग कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही. प्रत्येक शेतकऱ्याची पीककर्ज परतफेड करण्याची मुदत ३१ मार्च किंवा ३० जून असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पीककर्जाची परतफेडीची मुदत लक्षात घेऊन त्यापूर्वीच कर्ज भरणे गरजेचे आहे.  - प्रकाश अष्टेकर, उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com