राज्यातील शिल्लक कापसाविषयी संभ्रम 

राज्यात आता अवघा दहा क्विंटल कापूस शिल्लक असून, त्यापैकी केवळ तीन क्विंटल एफएक्यू दर्जाचा असल्याचा दावा पणन महासंघ करीत आहे; परंतु शासनाकडून शेतकऱ्यांच्या घरातील कापसाची पडताळणी करण्यात आली त्यात २७ लाख क्विंटल कापूस शिल्लक असल्याचे समोर आले आहे.
cotton procurement
cotton procurement

नागपूरः राज्यात कापसाच्या शिल्लक साठ्याविषयी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात आता अवघा दहा क्विंटल कापूस शिल्लक असून, त्यापैकी केवळ तीन क्विंटल एफएक्यू दर्जाचा असल्याचा दावा पणन महासंघ करीत आहे; परंतु शासनाकडून शेतकऱ्यांच्या घरातील कापसाची पडताळणी करण्यात आली त्यात २० लाख क्विंटल कापूस मराठवाडा आणि खानदेशात; तर ७ लाख क्विंटल एकट्या विदर्भात मिळून आला. परिणामी, कापसाच्या शिल्लक साठ्याबाबतच संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. 

पणन महासंघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात या वर्षी ४३ लाख हेक्टरवर कापसाचा पेरा होता. त्यापैकी १८ लाख हेक्टर क्षेत्र एकट्या विदर्भात नोंदविण्यात आले. सीसीआयचा एजंट म्हणून पणन महासंघाकडून कापसाची खरेदी करण्यात आली. त्यामध्ये ८१.४० लाख क्विंटल पणन महासंघ, १२०.२३ लाख क्विंटल सीसीआय; तर १९८ लाख क्विंटल खरेदीचा वाटा खासगी व्यापाऱ्यांचा आहे. त्यानुसार राज्यात आजवर सुमारे ४०० लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली. महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने खरेदी केलेल्या ८१.४० लाख क्विंटलपोटी ४ हजार ३५५ कोटी रुपयांचे चुकारे करावे लागणार आहेत. यापैकी ३ हजार ९८२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. उर्वरित ३७३ कोटी रुपयांचे चुकारे लवकरच केले जातील, अशी माहिती पणन महासंघाकडून देण्यात आली.  राज्यातील जवळपास तीन लाखांवर शेतकऱ्यांनी पणन महासंघाला कापूस दिला. सद्यःस्थितीत राज्यात एकूण दहा लाख क्विंटल कापूसच शिल्लक असल्याचा दावा केला जात आहे. त्यामध्ये हमीभावाने खरेदीयोग्य असा एफएक्यू दर्जाचा केवळ तीन लाख क्विंटल कापूस असून, या महिनाअखेरपर्यंत त्याची खरेदी होईल, असेही पणन महासंघाकडून सांगण्यात आले. पणन महासंघाच्या संचालक मंडळाची ऑनलाइन बैठक नुकतीच झाली. त्यामध्ये कापसाच्या शिल्लक साठ्याबाबत चर्चा झाली. त्या वेळी अधिकाऱ्यांनी दहा लाख क्विंटल कापसाबाबत माहिती दिल्याचे सांगितले जाते.  कापसाविषयी दावे-प्रतिदावे  शेतकऱ्यांकडून सातबारा घेत नोंदणी करून त्याआड आपला कमी दरात घेतलेला कापूस हमीभावाने विकण्याचा प्रयत्न व्यापारी करीत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या घरातील कापसाचा शोध घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार परभणी जिल्ह्यातच पाच लाख ४४ हजार क्विंटल कापूस मिळाला. याच शोधमोहिमेत ११ लाख क्विंटल कापूस जळगाव जिल्ह्यात; तर धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत अंदाजे तीन लाख क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात असल्याचे सांगितले जाते. विदर्भातील यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांत सात लाख क्विंटल कापूस शिल्लक आहे. त्यामुळे राज्यातील शिल्लक कापसाचा साठा २७ ते ३० लाख क्विंटलपेक्षा अधिक असल्याने कापसाच्या एकूण साठ्याचे गौडबंगाल वाढले आहे.  प्रतिक्रिया लागवड क्षेत्र, उत्पादकता, खरेदी केलेला कापूस याचा ताळेबंद काढून शिल्लक साठ्याचा अंदाज लावला जातो. त्यानुसार अधिकाऱ्यांनी बैठकीत आता केवळ दहा लाख क्विंटल कापूस शिल्लक असून, त्यातील तीन लाख क्विंटल खरेदीयोग्य, एफएक्यू दर्जाचा असल्याचे सांगितले. सध्या १८२ जिनिंगवर खरेदी सुरू असली तरी पावसामुळे अनेक ठिकाणी ती बंद करावी लागते. परिणामी, कापूस खरेदीला वेळ लागणार आहे.  - अनंतराव देशमुख, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ.  शासन निर्देशानुसार नोंदणी केलेला कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या घरी जाऊन बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी पडताळणी केली. त्यापूर्वी शेतकऱ्याला अशाप्रकारे पडताळणीसाठी कर्मचारी घरी येणार असल्याची माहिती फोनद्वारे देण्यात येत होती. गावात पोचल्यानंतर पोलिस पाटील, सरपंच किंवा अन्य प्रतिष्ठित व्यक्तीला सोबत घेऊन पंचनाम्याची प्रक्रिया पार पाडली जात होती. त्यानुसार आता जिल्ह्यात साडेतीन हजार शेतकऱ्यांकडे सरासरी ७० हजार क्विंटल कापूस असण्याची शक्यता आहे.  - सुरेश कटके, जिल्हा उपनिबंधक, यवतमाळ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com