काँग्रेसचा एक, राष्ट्रवादीच्या तीन आमदारांचे राजीनामे 

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या चार आमदारांचे राजीनामे 
काँग्रेस, राष्ट्रवादीच्या चार आमदारांचे राजीनामे 

मुंबई ः काँग्रेसचे मुंबईतील आमदार कालिदास कोळंबकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवेंद्रसिंहराजे भोसले, वैभव पिचड आणि संदीप नाईक या चौघांनी मंगळवारी आमदारकीचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला. यावेळी त्यांच्यासोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे उपस्थित होते. राजीनामा दिलेले सर्वजण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 

दरम्यान, आघाडीतील ५० पेक्षा अधिक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी केला. सध्या कोणीही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्यास उत्सुक नाहीत. अनेकांची पक्षावरील निष्ठा संपत चालली आहे. आघाडीचे अनेक दिग्गज नेते आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत आणि भाजपात प्रवेश करत आहे. सध्या अनेक आमदार संपर्कात असून तेदेखील लवकरच भाजपात प्रवेश करतील, असे महाजन म्हणाले. 

विधानसभा निवडणुकीआधी राज्यात पक्षांतराचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. एकापाठोपाठ एक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाजप-शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. सातारा-जावळी मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंगळवारी आमदारकीचा राजीनामा दिला. शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपात प्रवेश करण्याची शक्यता असून त्यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. राजीनामा दिल्यानंतर प्रतिक्रिया देताना शिवेंद्रसिंहराजेंनी सांगितले, की “मतदारसंघातील कामे न झाल्याने आपण आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे आहे. संध्याकाळी कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. भाजपासोबत जाणे जास्त योग्य होईल असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे” असेही त्यांनी या वेळी म्हटले.

राष्ट्रवादीचे नवी मुंबईतील आमदार संदीप नाईक यांनीदेखील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. गेले अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या माध्यमातून सर्व कामे होत आली आहेत. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील आणि देशातील परिस्थिती बदलली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातूनच शहराचा विकास शक्य असल्याची धारणा नवी मुंबईतील नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची झाली आहे. त्यामुळेच आपण भाजपामध्ये प्रवेश करत असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या संदीप नाईक यांनी राजीनाम्यानंतर दिली. 

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचे आमदार पुत्र वैभव पिचड यांनीसुद्धा आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तसेच, काँग्रेसमध्ये नावापुरतेच असलेले आमदार कालिदास कोळंबकर यांनी देखील आमदारकीचा राजीनामा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com