काँग्रेसने ५८ वर्षांनी भेदला भाजपचा गड

नागपूर पदवीधर मतदारसंघात ५८ वर्षांनी कॉंग्रेसने भाजपच्या गडाला सुरुंग लावत विजयी पताका फडकविली. महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. अभिजित वंजारी यांनी भाजपचे संदीप जोशी यांचा १८ हजार ९१० मतांनी पराभव केला.
Congress breaks BJP's stronghold after 58 years
Congress breaks BJP's stronghold after 58 years

नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात ५८ वर्षांनी कॉंग्रेसने भाजपच्या गडाला सुरुंग लावत विजयी पताका फडकविली. महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. अभिजित वंजारी यांनी भाजपचे संदीप जोशी यांचा १८ हजार ९१० मतांनी पराभव केला. आज दुपारी पार पडलेल्या मतमोजणीनंतर त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा करण्यात आली. ॲड. अभिजित वंजारी यांना ६१ हजार ७०१ मत तर भाजपचे संदीप जोशी यांना ४२ हजार ७९१ मते मिळाली.

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या १ डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतदानानंतर गुरुवारी (ता. ३) दुपारपासून मतमोजणीस सुरुवात झाली. यामध्ये अभिजित वंजारी यांना पाचव्या फेरीत ५६ हजार ५३० तर  संदीप जोशी यांना ४१ हजार १७२ पहिल्या पसंतीचे मत मिळाले. यामध्ये वंजारी यांना १४ हजार ३५८ मतांची आघाडी होती. मात्र, एकूण मतानुसार ठरलेला ६० हजार २४७ मतांचा कोटा दोन्ही उमेदवारांनी पूर्ण केला नसल्याने बाद फेरीस सुरुवात करण्यात आली.

शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अभिजित वंजारी यांनी ६१ हजार ७०१ मत घेऊन कोटा पूर्ण करीत विजय पटकाविला. भाजपचे संदीप जोशी यांना ४२ हजार ७९१ मत मिळाली. यानंतर विभागीय आयुक्त संजीवकुमार यांनी ॲड. अभिजित वंजारी यांना प्रमाणपत्र प्रदान केले.

यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, सेनेचे खासदार कृपाल तुमाने, आमदार विकास ठाकरे, माजी मंत्री राजेंद्र मुळक, नाना गावंडे, राष्ट्रवादीचे नेते आणि कॉंग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अभिजित वंजारी यांच्या विजयाने कॉंग्रेससह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर एकच जल्लोष केला.

कार्यकर्ते, नेत्यांच्या मेहनतीचा विजय ः वंजारी भाजपच्या बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपूर पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे सर्वच नेते व कार्यकर्त्यांनी मेहनत घेत विजयासाठी प्रयत्न केले. याला जनतेच्या आशीर्वादाची जोड मिळाली. त्यामुळेच विजय सहज शक्य झाल्याचे ॲड. अभिजित वंजारी म्हणाले. मिळालेला विजय सर्वसमावेशक असून जनतेचा विश्वास सार्थ करायचा आहे. त्यासाठी पूर्णवेळ प्रयत्न करणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com