काँग्रेसने ‘मिशेलमामा’चे कनेक्‍शन आधी सांगावे : पंतप्रधान मोदी

काँग्रेसने ‘मिशेलमामा’चे कनेक्‍शन आधी सांगावे : पंतप्रधान मोदी
काँग्रेसने ‘मिशेलमामा’चे कनेक्‍शन आधी सांगावे : पंतप्रधान मोदी

सोलापूर : ‘‘हेलिकॉफ्टर खरेदी घोटाळ्याप्रकरणी एका विदेशी एजंटला सरकारने ताब्यात घेतले आहे. त्याने फार मोठा खुलासा केला आहे, हा एजंट फक्त हेलिकॉफ्टर खरेदीमध्येच नव्हे, तर कॉंग्रेसच्या काळातील लढाऊ विमानांच्या खरेदीमध्येही लॉबिंग करीत होता. कॉंग्रेसचे जे नेते आज माझ्यावर राफेलप्रकरणी आरोप करीत आहेत, आधी त्यांनी त्यांचे ‘मिशेलमामा’चे कनेक्‍शन काय आहे, याचे उत्तर द्यावे,’’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (ता. ९) राफेलप्रकरणी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपाला जोरदार हल्लाबोल करीत प्रत्युत्तर दिले. तसेच चौकीदार आपली सफाई मोहीम अशीच चालू ठेवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद चौपदरीकरण व भुयारी गटारीचे लोकार्पण, तसेच स्मार्ट सिटी योजनेंतर्गत अमृत योजनेतून हद्दवाढ भागात मलनिस्सारण व्यवस्था सुधारणा, एबीडी एरियातील पाणी व मलनिस्सारण सुधारणा, उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनी आणि पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ३० हजार घरांच्या गृहप्रकल्पाची पायाभरणी श्री. मोदी यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलची कळ दाबून करण्यात आली. त्या वेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.  राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार ॲड. शरद बनसोडे, माजी आमदार नरसय्या आडम व्यासपीठावर होते. मोदींनी भाषणाची सुरुवात आणि शेवट मराठीने केला. विठ्ठल-रुक्‍मिणी, स्वामी समर्थ महाराज यांचा उल्लेख करताना चार हुतात्म्यांनाही अभिवादन केले. तसेच, चार दिवसांवर आलेल्या ग्रामदैवत सिद्धेश्‍वर यात्रा आणि मकरसंक्रांतीच्या शुभेच्छाही मराठीतून दिल्या. श्री. मोदी म्हणाले, ‘‘सत्ता हेच सर्वस्व मानणाऱ्या विरोधकांना देशातील प्रगती दिसत नाही. खोटे बोलून, दिशाभूल करून कोणत्याही गोष्टीत राजकारण करण्याची, ढोल वाजवण्याची विरोधकांची नीती आहे. दलाली, कमिशनखोरी बंद झाली आहे. त्यामुळेच ही ओरड सुरू आहे. रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत सुविधांना आम्ही प्राधान्य दिले आहे. आघाडी सरकारच्या दहा वर्षांच्या तुलनेत आमच्या साडेचार वर्षांतील कामाची गती आणि स्तर वेगवान आहे. शहर आणि गाव यांच्यातील अंतर दूर झाले, तरच प्रगती होईल, हे लक्षात घेऊन काम सुरू आहे. स्मार्ट सिटी, गरिबांना घरे ही त्याची उदाहरणे आहेत.’’  पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘आघाडीच्या काळात दहा वर्षांत ९० हजार किलोमीटरचे रस्ते झाले. पण ,आम्ही साडेचार वर्षांत १ लाख ३० हजार किलोमीटरचे रस्ते हाती घेतले आहेत. घरकुल योजनेतही दहा वर्षांत १३ लाख घरे बांधण्यासाठी आघाडी सरकारने मंजुरी दिली, पण आम्ही आमच्या अल्पकालावधीत ७० लाख घरांना मंजुरी दिली. शंभर शहरे स्मार्टसिटीत समाविष्ट केली.’’ या वेळी अटल पेन्शन योजना, उडाण योजना, पंतप्रधान आवास योजना, विद्युतीकरण, महामार्ग निर्मिती या मुद्यांवर भर देत श्री. मोदी यांनी विकासकामांच्या जंत्रीकडे लक्ष वेधले.  श्री. मोदी यांनी सबका साथ सबका विकास हाच भाजप सरकारचा नारा आहे, असे सांगितले. ‘‘हेच आमचे संस्कार आहेत. त्याचा उल्लेख करीत दलित आणि आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, लोकसभेत सवर्णांना आरक्षण देणारे ऐतिहासिक विधेयक मंजूर झाले, हा मोठा निर्णय आहे. त्याशिवाय पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्या आणि भारत माता की जय, वंदे मातरम म्हणणाऱ्या बांधवांना भारतीय नागरिकत्व देण्याबाबतचे विधेयकही मंजूर झाले, हे दोन्ही निर्णय ऐतिहासिक आहेत. देशात बदल होतो आहे, देश बदलतो आहे,’’ असेही ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com