आगामी विधानसभा काँग्रेस आघाडी एकत्रच लढणार

आगामी विधानसभा काँग्रेस आघाडी एकत्रच लढणार
आगामी विधानसभा काँग्रेस आघाडी एकत्रच लढणार

मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा महायुतीपुढे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या धक्क्यातून सावरलेल्या दोन्ही काँग्रेसने आता आगामी विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर जागावाटपांच्या फॉर्म्युल्यावर चर्चा केली जाणार आहे.  लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सलग दुसऱ्यांदा पानिपत झाले. या निवडणुकीत काँग्रेसला केवळ एकाच जागेवर तर राष्ट्रवादीला ५ जागांवर विजय मिळवता आला आहे. शिवसेना-भाजपाच्या महायुतीपुढे पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या राज्यातील नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी मुंबईत पार पडली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली.  या बैठकीत निवडणुकीतील पराभवाची समीक्षा करण्यात आली. त्यानुसार विधानसभा निवडणुकीतही महायुतीचा विजयाचा वारू रोखण्यासाठी दोन्ही काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय घेतला. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले, की या बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थिती, लोकसभा निवडणूक निकाल आणि आगामी विधानसभा निवडणूक यावर चर्चा झाली. आगामी निवडणूक सर्वांनी एकत्र येऊन लढायचे ठरले असून, या संदर्भात आणखी बैठकी होतील. विखे पाटील यांच्यासोबत आणखी काही आमदार भाजपात जातील असे वाटत नाही. ज्या आमदारांनी पक्षविरोधी कारवाया केल्या, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.  या बैठकीला श्री. चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, सपाचे नेते अबू आझमी, युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा, हसन मुश्रीफ, बाबाजानी दुर्राणी, शेकापचे नेते जयंत पाटील, शेकापचे नेते गणपतराव देशमुख, सीपीआयचे नेते प्रकाश रेड्डी, काँग्रेसचे नेते माजी मंत्री नसीम खान, बविआचे हितेंद्र ठाकूर, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे शरद रणपिसे, जोगेंद्र कवाडे, गवई गटाचे राजेंद्र गवई आदी उपस्थित होते. 

‘मनसे’ बाबत निर्णय नाही’ महाआघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीनेही सहभागी व्हावे, असे आम्हाला वाटते. मात्र त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेला प्रतिसाद लक्षात घेता त्याबाबत अजून चर्चा झालेली नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. मनसेला महाआघाडीत घ्यायचे की नाही, याबाबत चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.

‘मताधिक्य अविश्वसनीयच’ लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट नसतानाही महायुतीच्या उमेदवारांना तीन ते चार लाखांच्या घरात मताधिक्य मिळाल्याबद्दल बैठकीत आश्चर्य व्यक्त करण्यात आले. लोकसभेतील पराभवाच्या कारणांचा शोध घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा जोमाने कामाला लागण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. युतीचे काही उमेदवार १५ ते २० हजार मताधिक्य घेऊन निवडून येतील, असे चित्र होते. असे असताना त्यांना मिळालेले मताधिक्य अविश्वसनीय असल्याची भावना आघाडीच्या नेत्यांनी बैठकीत मांडली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी हातकणंगले मतदारसंघात ईव्हीएम मशिनमध्ये गडबड करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला. मतमोजणीवेळी सहाही मतदारसंघात वायफाय सुरू असल्याचे दिसत होते, असे शेट्टी यांनी सांगितले. राज्यातील २० लाख ईव्हीएमचा हिशेब लागत नाही. या मशिन कुठे गेल्या, याबद्दल निवडणूक आयोग काहीच स्पष्टीकरण देत नसल्याबद्दल बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com