फोडाफोडीच्या शक्यतेमुळे महाविकास आघाडी सतर्क

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : भाजपच्या शपथविधीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण होण्याच्या शक्यतेने राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या गोटात विशेष खबरदारी घेतली जात आहे. सुरक्षेची बाब म्हणून या तिन्ही पक्षांनी आपल्या आमदारांना मुंबईतील तीन वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्याला ठेवले आहे. या तिन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते या ठिकाणी विशेष लक्ष ठेवून आहेत. तसेच या हॉटेलबाहेर नेते आणि कार्यकर्त्यांचे सुरक्षा कडे तैनात करण्यात आले आहे. 

राष्ट्रवादीकडून राजभवनात पत्र सादर दरम्यान, शनिवारी भाजपने घाईत मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रिपदी अजित पवार यांचा शपथविधी उरकून घेतला. त्याआधी भाजपने सत्तास्थापनेचा दावा करताना राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना सादर केले. या सगळ्या घडामोडी उजेडात आल्यानंतर राष्ट्रवादीने अजित पवार यांचा निर्णय वैयक्तिक असल्याचे स्पष्ट केले. तसेच अजित पवार यांच्या निर्णयाला पक्षाच्या आमदारांचा पाठिंबा नसल्याचे सांगितले. राष्ट्रवादीने आमदारांच्या बैठकीत अजित पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यांचे व्हीप जारी करण्याचे अधिकारही रद्द करण्यात आले. शनिवारच्या बैठकीला राष्ट्रवादीचे ४२ आमदार उपस्थित होते. त्यांच्या सह्या असलेले यासंदर्भातील पत्र राष्ट्रवादीने रविवारी राजभवनात सादर केले आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या बहुतेक आमदारांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत चार-पाच आमदार वगळता फारसे कुणीही नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

साहजिकच भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी आणखी आमदारांची आवश्यकता भासणार आहे. भाजपला येत्या शनिवारी (ता. ३०) बहुमत सिद्ध करायचे आहे. त्याआधी भाजपला १४५ या आकड्यापर्यंत पोचायचे आहे. त्यामुळे भाजपकडून आमदारांच्या फोडाफोडीचे प्रयत्न होणार हे अटळ आहे. त्यामुळे सतर्कतेपोटी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तिन्ही पक्षांनी आपल्या पक्षांच्या आमदारांना मुंबईतील तीन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये सुरक्षित ठेवले आहे. भाजप अथवा त्यांच्या पाठीराख्यांनी या आमदारांना संपर्क करू नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.

उद्धव ठाकरेंनी केले आमदारांना आश्वस्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीसुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची भेट घेतली. या नेत्यांनी आघाडीच्या आमदारांना घाबरू नका, कोणाच्याही दबावाला आणि आमिषाला बळी पडू नका, आपण सर्वजण एक आहोत, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे आश्वस्त केल्याचे समजते.

अजित पवार यांना समजावण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या गोटातून बंडखोर नेते अजित पवार यांची समजूत काढण्याचा प्रयत्न रविवारी पुन्हा झाला. खासदार सुप्रिया सुळे, पुतणे आमदार रोहित पवार यांनी याआधीच सोशल मीडियाच्या माध्यमातून अजित पवार यांना माघारी फिरण्याचे आवाहन केले. त्यानंतर दिलीप वळसे पाटील आणि जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे दिग्गज नेतेही अजित पवार यांची भेट घेऊन आले. तिघांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. परंतु अजित पवार माघारी फिरण्याच्या मनःस्थितीत नाहीत, असे समजते. 

भाजपची बैठक महाराष्ट्रात सध्या चालू असलेले सत्तानाट्य थांबण्याचे नाव घेत नाही. अशातच भाजपने रविवारी आमदारांची बैठक घेतली. बैठकीला भाजपचे विधानसभेचे ११८ (भाजप आणि अपक्ष आमदार) तर १९ विधान परिषद आमदार उपस्थित असल्याचा भाजपकडून दावा करण्यात आला. बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री पीयुष गोयल, माजी मंत्री विनोद तावडे आदी वरिष्ठ नेते उपस्थित होते. या वेळी आमदारांकडून नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कारही करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com