आघाडीतील १६२ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना सादर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी १६२ आमदारांचे सह्या असणारे पाठिंब्याचे पत्र सोमवारी (ता. २५) राज्यपालांकडे सादर केले आहे. भाजप बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरल्यानंतर सत्तास्थापनेसाठी आम्हाला संधी देण्यात यावी, अशी मागणी या नेत्यांनी या वेळी केली. तसेच राज्यपाल सांगतील तेव्हा आम्ही सर्व १६२ आमदारांची राज्यपालांसमोर परेड करण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ गटनेते जयंत पाटील, शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी (ता. २५) राजभवनात पत्र दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

या वेळी जयंत पाटील म्हणाले, की आम्ही राज्यपालांना विधानसभेतील १६२ आमदारांच्या सह्या असणारे पत्र दिले आहे. संख्याबळ नव्हते असे सांगत भाजपाने सत्तास्थापनेस असमर्थता दर्शवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यांच्याकडे आजही पुरेसे संख्याबळ नसल्याने भाजप बहुमत सिद्ध करू शकणार नाही. भाजप असमर्थ ठरल्यानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच घटकपक्षांना सरकार स्थापन करण्याची संधी द्यावी, अशी आमची मागणी आहे. पत्रावर राष्ट्रवादीच्या ५१ आमदारांच्या सह्या असून, ५४ पैकी ५३ आमदारांचे समर्थन असल्याचा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.  

या वेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे म्हणाले, की आम्ही वेळ वाढवून मागितली असतानाही आमची मागणी राज्यपालांनी फेटाळून लावली होती. लोकशाहीचा गळा दाबण्याचा हा प्रकार आहे. संख्याबळ असते तर दिवसाढवळ्या उजळ माथ्याने शपथ घ्यायला हवी होती, असा टोलाही त्यांनी लगावला.  

अजित पवार यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरूच बंडखोरी करून भाजपसोबत सत्ता स्थापन केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सोमवारीसुद्धा सुरूच होते. मात्र, अजित पवार यांच्यासोबत तब्बल ४ तास बैठक घेऊन चर्चा केल्यानंतरही त्यांचे मन वळविण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना अपयश आले आहे.

विधान भवनात रामराजे निंबाळकर यांच्या कार्यालयात ही बैठक झाली. चार तासांच्या चर्चेनंतर निंबाळकर, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ हे चारही नेते दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास बाहेर पडले. मात्र, बैठकीत ते अजित पवारांचे मन वळविण्यात अपयशी ठरल्याचे समजते. अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये बोलणे झाले नसल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. तसेच पुन्हा त्यांची भेट घेऊन त्यांना समजावणार असल्याचे वळसे-पाटील यांनी सांगितले. अजित पवार यांनी पदभार स्वीकारलाच नाही  देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्यासोबत शनिवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला होता. यानंतर सोमवारी (ता. २५) श्री. फडणवीस यांनी पदभार स्वीकारला आहे. परंतु, अजित पवार यांनी मात्र उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला नाही. त्यामुळे भाजपच्या नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नेमके अजित पवार यांच्या मनात काय सुरू आहे, याचा कोणालाही थांगपत्ता लागत नाही. यामुळे भाजपच्या गोटातही संभ्रम आहे. 

पदभार स्वीकारताच फडणवीस यांनी केली पहिली स्वाक्षरी   मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी विधान भवनात पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच फडणवीस यांनी पहिली स्वाक्षरीही केली. फडणवीसांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर स्वाक्षरी केली आहे. दादरच्या श्रीमती कुसुम किरण वेंगुर्लेकर यांना एक लाख वीस हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला. या वेळी मुख्य सचिव अजोय मेहताही उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com