नाशिकला लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी काॅँग्रेस आग्रही

नाशिकला लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी काॅँग्रेस आग्रही
नाशिकला लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी काॅँग्रेस आग्रही

नाशिक :  आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नाशिकमधून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ निवडणूक लढवणार नसतील, तर नाशिकसह दिंडोरी लोकसभा मतदारसंघ जागावाटपात काॅँग्रेसला सोडावा, अशी आग्रही मागणी काॅँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे व शहराध्यक्ष शरद आहेर यांनी गुरुवारी (ता. २०) झालेल्या आढावा बैठकीत केली. जिल्ह्यातून जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा निर्धारही या वेळी व्यक्त करण्यात आला. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर काॅँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र स्तरावरील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक गुरुवारी काॅँग्रेस भवनात झाली. पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र समितीचे प्रभारी आमदार चेल्लर वामसीचंद रेड्डी, जिल्हा प्रभारी के. सी. पाडवी, सहप्रभारी डी. डी. पाटील, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, जयप्रकाश छाजेड, जळगावचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जळगावचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, धुळ्याचे किशोर पाटील, डॉ. हेमलता पाटील, वत्सला खैरे, डॉ. तुषार शेवाळे, वत्सला खैरे यांच्यासह ब्लॉक काॅँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव पानगव्हाणे पाटील यांनी मांडल्यावर त्याला संदीप पाटील यांनी अनुमोदन दिले. राष्ट्रवादी काॅँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाशिक लोकसभेची जागा लढविणार नसतील तर ती काॅँग्रेसला सोडावी. पक्षाकडे सक्षम उमेदवार आहे, याकडे आहेर यांनी लक्ष वेधले. त्याचप्रमाणे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून गेल्या तीन निवडणुकांत राष्ट्रवादी काॅँग्रेसचा उमेदवार पराभूत होत असल्याने तो मतदारसंघही काॅँग्रेसला सोडावा, अशी मागणी करण्यात आली. जळगाव व रावेर लोकसभेच्या मागील दोन्ही निवडणुकांत राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत झाल्याने रावेरसाठी शिरीष चौधरी, तर जळगावमधून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. जनसंपर्क अभियानाची सध्याची स्थिती, शक्ती ॲप आदींविषयी प्रभारी आमदार रेड्डी यांनी या वेळी माहिती जाणून घेतली. या वेळी नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर जिल्ह्यांतून पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com