Congress will on Road for farmers in Nagpur district
Congress will on Road for farmers in Nagpur district

नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी कॉंग्रेस उतरणार रस्त्यावर

नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर करण्यात आली. त्याचा पुनर्विचार होत वाढीव मदत जाहीर न केल्यास शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा जिल्हा कॉंग्रेसने दिला आहे. 

मॉन्सूनोत्तर पाऊस आणि अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यातील ५४ हजार २०२ हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले आहे. १ लाख १९ हजार ३५५ शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे. राज्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी बांधावर जात पीक नुकसानीची माहिती घेतली आणि शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देण्याबाबत आश्‍वस्त केले होते. मात्र राज्यपालांच्या घोषणेनुसार नुकसान झालेल्या क्षेत्रासाठी दोन हेक्‍टरपर्यंत हेक्‍टरी आठ हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना १६ हजार रुपयांची मदत मिळेल.

बागायती, बारमाही पिकांसाठी प्रति हेक्‍टरी १८ हजार रुपयांची मदत दोन हेक्‍टरपर्यंत दिली जाणार आहे. त्यांना जास्तीत जासत ३६ हजार रुपयांची मदत मिळेल. राज्यपालांनी जाहीर केलेली मदत ही कोणत्या निकषावर आधारित आहे, हे कळायला मार्ग नाही. ही मदत जाहीर करण्यापूर्वी त्यांनी सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून राज्यातील नुकसानीची माहिती जाणून घ्यायला हवी होती. शेतकऱ्यांनी खरीप हंगामाकरिता बॅंका, सावकार आणि उसनवारीच्या माध्यमातून कर्ज घेतले होते. मात्र उत्पादन शून्य झाल्याने शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करता येणार नाही. अशा वेळी रब्बी हंगामात पिकाची लागवड कशी करावी, असा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. 

नागपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत. पंचनामे करण्यासाठी सरकारने घालून दिलेल्या निकषांमुळे तलाठी, कृषी अधिकारी अणि महसूल विभागाचे अधिकारी गोंधळात पडले आहेत. जिल्हयात बहूतांश शेतकऱ्यांचे नुकसान १०० टक्‍के आहे. त्यामुळे नुकसनीचे पंचनामे वेळेत होणार नसतील तर शेतकऱ्यांना मदत कधी मिळेल, हे कुणीही सांगायला तयार नाही. त्यामुळे मदतीत भरीव वाढ आणि ती सरसकट मिळावी, अशी मागणी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी केली आहे. मागणीच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com