काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीचा एल्गार; जागावाटप पूर्ण

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीचा एल्गार; जागावाटप पूर्ण
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीचा एल्गार; जागावाटप पूर्ण

मुंबई : गेले सहा महिने विविध समविचारी पक्षांशी चर्चा केल्यानंतर काँग्रेस- राष्ट्रवादीने शिवसेना- भाजप युतीच्या विरोधात महाआघाडीचा एल्गार केला.महाआघाडी लोकसभेच्या ४८ जागा लढणार असून यापैकी काँग्रेस २४, राष्ट्रवादी काँग्रेस २०, स्वाभिमानी शेतकरी संघटना २, तर बहुजन विकास आघाडी आणि आमदार रवी राणा यांची युवा स्वाभिमान संघटना प्रत्येकी एक जागा लढवेल. महाआघाडीत एकूण ५६ पक्ष, तसेच संघटनांचा समावेश आहे. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील महाआघाडी आकाराला आल्याने राज्यातील बहुतांश लोकसभा मतदारसंघांत महाआघाडी, शिवसेना- भाजप युती, वंचित बहुजन आणि सप- बसप आघाडी यांच्यात तिरंगी- चौरंगी लढत रंगेल हे स्पष्ट झाले आहे.  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर, युवा स्वाभिमानीचे आमदार रवींद्र राणा, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी शनिवारी (ता.२४) संयुक्त पत्रकार परिषदेत महाआघाडीची घोषणा केली. या वेळी शिवसेना- भाजप युतीवर कडाडून टीका करताना महाआघाडीच्या नेत्यांनी देशात आमचे सरकार आल्यानंतर शेतकरी, कामगार, दलित, आदिवासी, अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण केले जाईल, अशी ग्वाही दिली. सत्ताधारी भाजपकडून साम, दाम, दंड, भेद नीतीचे राजकारण केले जात आहे. या राजकारणाला काही पक्ष बळी पडत आहेत, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली.

आंबेडकर भाजपची बी टीम  धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी आघाडीत सहभागी होणाऱ्या मित्रपक्षांना १० जागा सोडण्याचे आम्ही ठरवले होते. एका गटाला सहा जागा देण्यात येणार होत्या. मात्र, या गटाला आघाडीत रस नव्हता. आघाडीच्या मतांमध्ये फूट पाडून कुणाला तरी फायदा मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेला गट हा भाजपची बी टीम आहे, अशी टीका अजित पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता केली. 

खर्चाच्या दीडपट उत्पन्न देणार भाजपने गेल्या निवडणुकीत शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, गेल्या पाच वर्षांत सरकारला आश्वासन पाळता आले नाही. महाआघाडी सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव दिला जाईल, असे राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी सांगितले.

'कमळा'वर तणनाशक फवारणार भाजपने अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सर्वसामन्य, गोरगरीब शेतकऱ्यांची फसवणूक केली. भाजपला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी म्हणून कमळावर तणनाशक फवारणी करण्यासाठी आपण आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे राजू शेट्टी यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, महाआघाडीची घोषणा होत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील अनुपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com