‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : रणजितसिंह देशमुख

परराज्यांतील ब्रँडकडून महानंदची बदनामी केली जात आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी येथे केला.
‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : रणजितसिंह देशमुख
‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : रणजितसिंह देशमुख

मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’चा ५४ कोटी रुपयांचा तोटा १५ कोटी रुपयांवर आला आहे. महानंदची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू असताना परराज्यांतील ब्रँडकडून महानंदची बदनामी केली जात आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी येथे केला. 

गोरेगाव येथील महानंद दुग्धशाळेत पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या अधिमंडळाच्या ५५ व्या ऑनलाइन वार्षिक सभेत श्री. देशमुख बोलत होते. या वेळी महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार, राजाभाऊ ठाकरे, राजेश परजणे, वसंत जगदाळे, सुभाष निकम, निळकंठ कोढे, राजेंद्र सूर्यवंशी, फुलचंद कराड व ऑनलाइन पद्धतीने महासंघाचे संचालक आ. हरिभाऊ बागडे, विनायक पाटील, वामनराव देशमुख, विष्णू हिंगे, चंद्रकांत देशमुख, व्यवस्थापकीय संचालक श्यामसुंदर पाटील, भा.प्र.से. व महानंदच्या सभासद संघांचे प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी ऑनलाइन पद्धतीने व प्रत्यक्ष उपस्थित होते. 

अध्यक्ष श्री. देशमुख म्हणाले, ‘‘महानंदबद्दल सध्या बदनामीकारक बातम्या छापून येत आहे. परराज्यांतील ब्रँडद्वारे हे षड्‌यंत्र केले जात आहे. महासंघ ऊर्जितावस्थेत आल्यास त्यांची महाराष्ट्रातील विक्री कमी होणार आहे. वास्तविक महानंद ही राज्याची अस्मिता असून, लाखो दूध उत्पादकांची मातृसंस्था आहे. त्यामुळे चुकीच्या बातम्याद्वारे केवळ महासंघच नाही, तर संपूर्ण सहकार क्षेत्र व सहकारी संस्था बदनाम होत आहे.’’ 

दरम्यान, महानंदची बदनामी करणाऱ्याची चौकशी करण्याचा ठराव संचालक मंडळाने घेतला असून, तो ठराव राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. प्रास्ताविक व्यवस्थापकीय संचालक श्री. पाटील यांनी केले. उपाध्यक्ष श्री. पवार यांनी आभार मानले. 

दृष्टीक्षेपात महानंद...

  • महासंघाची उलाढाल : २९८. ५७ लाख 
  • दुधाची सरासरी विक्री : १.५३ लाख लिटर 
  • दुधाची एकूण खरेदी : ६.५० कोटी लिटर 
  • एकूण ठेवी : १२६ कोटी रुपये 
  • सरकारकडून निधी  राज्य सरकारकडून अतिरिक्त दूध योजनेसाठी २८७ कोटी रुपये दिले होते. त्यापैकी १२५ कोटी रुपये राज्य शासनाला परत केले आहेत. तर ४० कोटी रुपयांची पावडर व बटर शासनाच्या योजनेत दिले असून राज्य सरकारने महानंदला ६० कोटी रुपये आर्थिक स्वरूपात अनुदान दिले आहे. पावडरचे भाव स्थिर राहिले असते, तर अतिरिक्त दूध योजनेसाठी खर्च केलेला निधी व नफा देखील शासनाला दिला असता. अतिरिक्त दूध योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दूध ओतून देण्याची वेळ आली नाही व सहकारी संघांना देखील आधार मिळाला तर योजना यशस्वी राबविल्यामुळे महानंदला आर्थिक फायदा तर मिळालाच, परंतु अडचणीच्या काळात महासंघ उभा राहिल्यामुळे सरकारला अतिरिक्त दुधाचे व्यवस्थापन करण्यात मोठी मदत झाली, असल्याची माहिती अध्यक्ष देशमुख यांनी दिली. 

    ‘महानंद’-‘गोकुळ’ करार...  ‘आरे’ची उत्पादने खासगीकडे उत्पादित केली जात होती. ते महानंदकडे उत्पादनाचे व विक्रीचे काम देण्यात आले आहे. त्यासोबत ६४ स्टॉल हस्तांतरित केले आहेत. त्यामुळे महासंघाची दुग्धशाळा पूर्ण क्षमतेने कार्यरत झाली असून, शासनाच्या पाठबळावर महासंघाचे गतवैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय राज्यातील नामांकित कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे (गोकुळ) प्रतिदिन ३ लाख लिटर दुधाचे को-पॅकिंगबाबत महानंद व गोकुळ असा करार झाल्यामुळे महासंघास चांगला फायदा होणार आहे. दोन्ही सहकारी संस्था एकत्र आल्याने सहकार विश्‍वासाठी हे अनोखे उदाहरण ठरले आहे. 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com